वाकड, हिंजवडीत पेट्रोलपंपाच्या मालकांवर गुन्हे दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2020 12:58 PM2020-03-28T12:58:55+5:302020-03-28T12:59:45+5:30
अत्यावश्यक सेवेतील वाहनांनाच इंधन विक्री करण्यात यावी, असे शासनाकडून निर्देश
कोरोना विषाणूंचा संसर्ग रोखण्यासाठी अत्यावश्यक सेवेतील वाहनांखेरीज इतर कोणत्याही वाहनांसाठी इंधन विक्री करण्यास मनाई करण्यात आली आहे. या आदेशाचा भंग करून सर्व वाहनांसाठी इंधन दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी दोन पेट्रोल पंपांच्या मालकांविरोधात वाकड व हिंजवडी पोलीस ठाण्यात दोन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रकाश रामचंद्र बालवडकर (पूर्ण नाव पत्ता माहीत नाही) व धर्मेंद्र हिडनारायण दुबे (रा. दुबे बिल्डींग, कामगार नगर, पिंपरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. कोरोना साथ आटोक्यात आणण्यासाठी संचारबंदी करण्यात आली आहे. तसेच अत्यावश्यक सेवेतील वाहनांनाच इंधन विक्री करण्यात यावी, असे निर्देश शासनाकडून देण्यात आले आहेत. मात्र त्याचे उल्लंघन करून सर्व वाहनचालकांना इंधनाची विक्री केल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपींवर गुन्हे दाखल केले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिला प्रकार वाकड येथील उड्डाणपुलाजवळील बालवडकर पेट्रोल पंप येथे मंगळवारी (दि. 24) रात्री उघडकीस आला. आरोपी प्रकाश बालवडकर हा शासनाच्या मनाई आदेशाचे उल्लंघन करून त्याच्या मालकीच्या बालवडकर या पेट्रोल पंपावर सर्व वाहनचालकांना पेट्रोलची विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पेट्रोल पंपावर धाव घेतली. हा पंप माझ्या मालकीचा आहे, मी काय करायचे ते करेन, तुम्ही निघून जावा, नाहीतर तुमचे काही खरे नाही. मी कोण आहे हे तुम्हाला माहिती नाही, तुमची नोकरी घालवू शकतो, असे म्हणून आरोपी बालवडकर याने पोलिसांच्या कामात अडथळा निर्माण केला. वाकड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक महेश स्वामी यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि. 24) फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी बालवडकर याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
दुसरा प्रकार हिंजवडी- माण रस्त्यावर शुक्रवारी (दि. 27) घडला.
पोलीस नाईक कुणाल दिलीप शिंदे यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शासनाच्या मनाई आदेशाचे उल्लंघन करून आरोपी धर्मेंद्र दुबे याने हिंजवडी - माण रस्त्यावरील त्याच्या गायत्री पेट्रोल पंपावर दुपारी अडीचच्या सुमारास सर्व वाहनांसाठी इंधन विक्री केली. त्यामुळे पेट्रोल पंपावर वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. त्यामुळे दुबे याच्यावर हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.