सुधन्वा गोंधळेकर याच्यावर पुण्यात दाखल होता खुनाचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 09:42 PM2018-08-11T21:42:38+5:302018-08-11T21:47:10+5:30
गणेशखिंड रोडवरील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या रॅगिग प्रकरणातून एकाचा खुन झाला होता़.या प्रकरणात सुधन्वा गोंधळेकर (वय २१, रा़ करंजे फाटा, सातारा) आणि सचिन कुलकणी या दोघांना २९ मार्च २००० रोजी चतु:श्रृंगी पोलिसांनी अटक केली होती़.
पुणे : राज्य दहशतवाद विरोधी पथकाने वैभव राऊत याला मदत करणाऱ्या सुधन्वा गोंधळेकर याला अटक केली असून त्याला पुण्यात २००० साली खुनाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती़. एटीएसने शनिवारी त्याच्याकडून मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे़.
गणेशखिंड रोडवरील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या रॅगिग प्रकरणातून एकाचा खुन झाला होता़. या प्रकरणात सुधन्वा गोंधळेकर (वय २१, रा़ करंजे फाटा, सातारा) आणि सचिन कुलकणी या दोघांना २९ मार्च २००० रोजी चतु:श्रृंगी पोलिसांनी अटक केली होती़. या खटल्याचा १५ सप्टेंबर २००३ रोजी निकाल लागला असून त्यातून दोघांची पुराव्या अभावी निर्दौष मुक्तता करण्यात आली होती़.
दरम्यान, एटीएसने सुधन्वा गोंधळेकर याच्याकडून शनिवारी मोठा शस्त्र साठा जप्त केला आहे़. त्यात १० गावठी पिस्तुल मॅगझिनसह, १ गावठी कट्टा, १ एअरगन, १० पिस्टल बॅरल, ६ अर्धवट तयार पिस्टल बॉडी, ६ पिस्टल मॅगझिन, ३ अर्धवट तयार मॅगझीन, ७ अर्धवट तयार पिस्टल स्लाईउ, १६ रिले स्विच, ६ वाहनांच्या नंबर प्लेटस, १ ट्रिगर मॅकॅनिझम, १ चॉपर, १ स्टील चाकू असा शस्त्र साठा जप्त करण्यात आला आहे़ तसेच इतर अर्धवट बनलेले शस्त्राचे सुटे भाग, टॉर्च, बॅटरी, हँड ग्लोव्हज, इतर अनुषंगिक साहित्य, इलेक्ट्रॉनिक वस्तू, पुस्तके, स्फोटकाबाबत हँड बुक, एक्प्लोसिव्ह व मोबाईल प्रिंटआऊट, रिले स्विच सर्किट ड्रॉईग, पेनड्राईव्हज, हार्डडिक्स, मेमरी कार्ड इत्यादी साहित्य जप्त केले आहे़.
दरम्यान, पुणे, सातारा, सोलापूर भागातून एटीएसच्या पथकाने बारा जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. राऊत, कळसकर, गोंधळेकर हिंदुत्ववादी संघटनेशी संबंधित आहेत. दरम्यान, राऊत, कळसकर, गोंधळेकर यांच्या संपर्कात असलेल्या बारा जणांना एटीएसकडून शनिवारी ताब्यात घेण्यात आले. एटीएसच्या मुंबई पथकाकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.
या प्रकरणात अटक करण्यात आलेले आरोपी राऊत आणि त्याचे साथीदार मुंबई, पुणे, सोलापूर भागात घातपाती कारवाई करण्याच्या तयारीत असल्याचा संशय एटीएसकडून व्यक्त करण्यात आला. गोंधळेकर मूळचा साताऱ्यातील आहे. त्याचा पुण्यात ग्राफिक डिझायनिंगचा व्यवसाय असल्याची माहिती मिळाली आहे.