जेजुरीत आचारसंहिता धुडकावून राजकीय फलक लावल्याने गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2019 01:09 PM2019-03-13T13:09:14+5:302019-03-13T13:11:30+5:30
सर्व फलक हे अनाधिकृत व शासनाची तसेच ग्रामपंचायतची कुठलीही पूर्वपरवानगी नसताना लावण्यात आल्याचे पोलिसांकडे तक्रार देण्यात आली.
जेजुरी : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ जाहीर झाल्यानंतर तात्काळ आचारसंहिता लागू करण्यात आली. त्यानंतर सर्व प्रशासकीय यंत्रणा आचारसंहितेच्या अंमलबजावणीच्या कामाला लागली आहे. परंतु, अजूनही काही ठिकाणी पोलीस व प्रशासकीय यंत्रणा पोहचलेल्या नाहीत. त्यामुळे काही गावात मात्र याबाबत कमालीचे दुर्लक्ष केले जाते याचाच परिणाम गावातील राजकीय वाद -विवाद यावर दिसून येतो. जेजुरी पोलीस ठाण्यात राजकीय पुढाºयांचे फलक लावण्याच्या कारणावरून पोलीस ठाण्यात मंगळवारी दि. १२) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी जेजुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र किसन कुंजीर (रा. वाघापूर) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. नव्याने सुरू झालेल्या हॉटेल संस्कृती या व्यावसायिक दुकानाचे उद्घाटन समारंभ निमित्त येथील परिसरात राजकीय पुढाऱ्यांचे फोटो असलेले फलक लावण्यात आले होते. यामुळे आचारसंहितेचा भंग होऊन राजकीय वाद निर्माण होईल अशी वाघापूर ग्रामपंचायतीला भीती वाटली. यानंतर ग्रामपंचायत शिपाई राजेंद्र कुंजीर यांनी हे बोर्ड व बॅनर्स तात्काळ काढून घेणे बाबत हॉटेल व्यावसायिकास सांगितले. या गोष्टीचा राग मनात धरून हॉटेल मालक राहुल अशोक कोलते (रा शिंदेवाडी,ता. हवेली) याने कर्मचाऱ्याला मारहाण केली.
यानंतर येथील गाव कामगार तलाठी विश्वास आटोळे ग्रामसेविका श्रीमती विजया भगत यांनी घटनास्थळी भेट देऊन याबाबत पोलिसांना माहिती कळवली येथील लावण्यात आलेले सर्व फलक हे अनाधिकृत व शासनाची तसेच ग्रामपंचायतची कुठलीही पूर्वपरवानगी नसताना लावण्यात आल्याचे पोलिसांकडे तक्रार देण्यात आली. या तक्रारीच्या अनुषंगाने गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. आरोपी राहुल कोलते यास अटक करण्यात आली आहे. पुरंदर तालुक्यात गुन्हा दाखल झाल्यामुळे सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे निवडणुकीच्या कालावधीत सर्व राजकीय पक्ष व कार्यकर्त्यांनी आचारसंहितेचा आदर करावा अशी माहिती पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांनी दिली