लॉकडाऊन, जमावबंदी असतानाही केशकर्तनालय सुरू ठेवल्याने गुन्हा दाखल; मावळ तालुक्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2020 02:47 PM2020-04-08T14:47:13+5:302020-04-08T14:51:20+5:30
दुकानात लोकांची गर्दी करून कटिंग करताना आढळून आला.
पिंपरी : कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन आहे. तसेच पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत जमावबंदी आहे. या आदेशाचे उल्लंघन करून केशकर्तनालय सुरू ठेवल्याने एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मावळ तालुक्यातील दारूंब्रे येथे मंगळवारी (दि. ७) दुपारी साडेबाराच्या सुमारास हा प्रकार घडला.
गणेश ज्ञानदेव ढमाले (वय ३४, रा. दारूंब्रे, ता. मावळ) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस कर्मचारी समाधान लक्ष्मण फडतरे (वय २९) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या शिरगाव पोलीस चौकीत फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना विषाणूंचा संसर्ग होऊ नये म्हणून देशात लॉकडाऊन आहे. तसेच पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाग्रस्त रुग्ण आढळल्याने जमावबंदी करण्यात आली आहे. मात्र या आदेशाचे उल्लंघन करून आरोपी याने त्याचे हेअर सलून सुरू ठेवले. तसेच दुकानात लोकांची गर्दी करून कटिंग करताना आढळून आला. याबाबत पोलिसांनी विचारणा केली असता, त्याने आरडाओरडा करून सार्वजनिक शांततेचा भंग केला. शिरगाव पोलीस तपास करीत आहेत.