मुलांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती वाढीस लागतेय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:09 AM2020-12-27T04:09:27+5:302020-12-27T04:09:27+5:30

पुणे : आजुबाजूचे जग वेगाने बदलत असताना लहान मुलांच्या भावनिक, मानसिक विश्वातही बरीच उलथापालथ होत आहे. कुटुंबासह राहणारी मुले ...

Is crime on the rise among children? | मुलांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती वाढीस लागतेय?

मुलांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती वाढीस लागतेय?

Next

पुणे : आजुबाजूचे जग वेगाने बदलत असताना लहान मुलांच्या भावनिक, मानसिक विश्वातही बरीच उलथापालथ होत आहे. कुटुंबासह राहणारी मुले मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीकडे वळत असल्याचे चित्र नुकत्याच प्रकाशित झालेल्या नॅशनल क्राईम रेकॉर्डस ब्युरोच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. सामाजिक सुरक्षिततेच्या दृष्टीने ही आकडेवारी पालकांच्या चिंतेत भर घालणारी ठरत आहे. कौटुंबिक संवाद, निसर्गाशी गट्टी, वाचनाची आवड, छंदांचा पाठलाग, नातेवाईकांविषयी आपुलकी आणि माणुसकीचा ओलावा मुलांना तारु शकेल, असे मत समुपदेशकांकडून नोंदवले जात आहे.

एनसीआरबीच्या अहवालानुसार बेघर किंवा निराधार मुलांपेक्षा घरात कुटुंबासोबत राहणाऱ्या मुलांमधील बालगुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. बेघर आणि निराधार मुलांमधील गुन्हेगारीचं प्रमाण कमी झाले आहे, ही सुखद बातमी आहे. पण कुटुंबासोबत राहणाऱ्या मुलांमधली वाढती गुन्हेगारी ही चिंतेचे कारण आहे. एकूण बाल गुन्हेगार आरोपी ६४५४ आहेत. त्यातले आई -वडिलांबरोबर राहणा-या मुलांनी केलेले गुन्हे ५८३४ आहेत.

मुलांना वेळ देता येत नसेल तर त्यांचे सर्व हट्ट पूर्ण करण्याचा पर्याय पालक स्वीकारतात. महागड्या वस्तू वापरण्याची आणि सर्व हट्ट पुरवून घेण्याची सवय लागल्याने मुलांना नकार पचवण्याची सवय राहत नाही. मग एखाद्या गोष्टीला नकार मिळाल्यास ती कोणत्याही पध्दतीने मिळवण्याची त्यांची धडपड सुरु होते. अशा काळात पालकत्व निभावण्याचे नवे आव्हान उभे राहिले आहे. मुलांचा वयोगट, गुन्हेगारीचा प्रकार याबाबत अधिक तपशीलात अभ्यास करुन त्यानंतर योग्य निष्कर्ष काढता येतील, असे जाणकारांचे मत आहे.

------------

मुलांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती का वाढतेय, याचा मुळापर्यंत जाऊन विचार करावा लागणार आहे. केवळ पालकांना किंवा मुलांना दोष देऊन चालणार नाही. दोन्ही बाजू समजून घेऊन, बारकाईने विचार करुन मार्ग शोधावा लागेल. घरात संवादाचा अभाव, अतिलाड, भावनिक-मानसिक असुक्षितता, हातात खुळखुळणारा पैसा अशा अनेक कारणांचा विचार करावा लागेल.

- श्रुती पानसे, समुपदेशक

----------------------

कोणत्या वयोगटातील मुले काय कारणाने कोणत्या स्वरुपाचे गुन्हे करत आहेत, त्यांचे राहणीमान या सर्व बाबींची सखोल माहिती समोर आल्याशिवाय निष्कर्ष काढणे अवघड आहे. मुले विघातक दिशेला जाऊ नयेत, यासाठी पालकांचे मुलांवर लक्ष असायला हवे. मुलांचे लाड करण्यापेक्षा त्यांची सुरक्षितता जास्त महत्वाची आहे. मुले जन्मत:च सर्व काही शिकून येत नाहीत. आपण त्यांना काय शिकवतो, कसे वातावरण देतो, अशा अनेक गोष्टी महत्वाच्या असतात. पालकांनी आपली जबाबदारी जबाबदारीने पार पाडायला हवी.

- डॉ. भूषण शुक्ला, बालमानसोपचारतज्ज्ञ

Web Title: Is crime on the rise among children?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.