बारामतीत ५० लाखांच्या फसवणूकप्रकरणी गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:12 AM2021-09-26T04:12:18+5:302021-09-26T04:12:18+5:30
--- बारामती : साखर कारखान्याचा बगॅस व भुस्सा खरेदी करणाऱ्या एका कंपनीतील कर्मचाऱ्याने बॅगस व भुस्सा घेऊन येणाऱ्या वाहतुकीची ...
---
बारामती : साखर कारखान्याचा बगॅस व भुस्सा खरेदी करणाऱ्या एका कंपनीतील कर्मचाऱ्याने बॅगस व भुस्सा घेऊन येणाऱ्या वाहतुकीची बिले कंपनीच्या अकाउंटला न भरता स्वत:च्या व मित्रांच्या बँक खात्यात भरून कंपनीची तब्बल ५० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला. या प्रकरणी कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
सतीश संदीपान देवकाते (रा. साईनगर, रुई, मूळ रा. इटकूर, ता. गेवराई, जि. बीड) असे गुन्हा दाखल झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बाळकृष्ण पोपट कदम (रा. बोरीपार्धी, ता. दौंड) हे सहा भागीदारांसह ए. व्ही. एंटरप्रायजेस ही फर्म चालवितात. या फर्मचे मुख्य कार्यालय केडगाव (ता. दौंड) येथे आहे. फर्मने सोयीसाठी बारामतीत विठ्ठलनगर, रुई येथे एक कार्यालय सुरू केले आहे. ही फर्म साखर कारखान्यांकडील बगॅस, भुस्सा खरेदी-विक्री करते. त्याच्या वाहतुकीसाठी भाडोत्री वाहने घेतली जातात. या वाहनांचे भाडे देण्याचे काम देवकाते याच्याकडे होते. त्यासाठी फर्मने बारामतीत एका बँकेत खाते उघडत त्या खात्याचा आयडी व पासवर्ड देवकाते याच्याकडे दिला होता. देवकाते हा देणेकऱ्यांची यादी व संबंधित बिलाची रक्कम फर्मच्या संचालकांच्या व्हाॅटसॲप ग्रुपवर पाठवत. त्यांच्याकडून संमती आल्यानंतर पुढे ऑनलाईन प्रणालीद्वारे वाहनमालकांना बिले अदा करीत होता. सन २०१७ पासून ही देणी ऑनलाईन पद्धतीने दिली जात होती.
मागील आठ दिवसांपूर्वी व्हाॅटस्ॲप ग्रुवर टाकलेली देणेकऱ्यांची माहिती व बँक खात्यांचा तपशील याबाबत फिर्यादीला शंका आली. देणेकऱ्यांची नावे तीच ठेवत खाते क्रमांक व आयएफएससी कोड बदलल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी तपासणी केली. यावेळी त्यांना वाहनमालकांना द्यायची रक्कम देवकाते याने स्वतःच्या, तसेच मित्रांच्या व नातेवाइकांच्या नावावर भरल्याचे दिसून आले. त्यांच्याकडे फिर्य़ादीने खातरजमा केली असता ही रक्कम पुन्हा देवकाते घेऊन जात असल्याचे दिसून आले. हिशेब केला असता ५० लाख रुपयांची रक्कम त्याने याप्रकारे वळती करीत फसवणूक केल्याचे दिसून आले. त्यामुळे बाळकृष्ण पोपट कदम (रा. बोरीपार्धी, ता. दौंड) यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे करीत आहेत.