अत्याचाराचा गुन्हा सीबीआयकडे द्यावा : पंधारे
By admin | Published: May 13, 2017 04:15 AM2017-05-13T04:15:08+5:302017-05-13T04:15:08+5:30
पुणे येथील मुलांचे निरीक्षण बालगृहात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी लहान मुलांवर केलेल्या अनैसर्गिक लैंगिक आत्याचारप्रकरणी
लोकमत न्यूज नेटवर्क
घोडेगाव : पुणे येथील मुलांचे निरीक्षण बालगृहात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी लहान मुलांवर केलेल्या अनैसर्गिक लैंगिक आत्याचारप्रकरणी चार दिवसांपासून घोडेगावजवळील पळस्टीक्यातील बालकाश्रमात वेगवेगळ्या चौकशी समित्या व पुण्याहून पोलीस येत असून, त्यांच्या प्रश्नांमुळे मुलांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. या चौकशी समित्यांकडून आरोपींवर कठोर कारवाई होण्याऐवजी हे प्रकरण मिटविण्यासाठी मुलांवर दबाव आणला जात आहे. यासाठी या प्रकरणाची चौकशी सीबीआयमार्फत व्हावी, अशी मागणी तक्रारदार व अनाथ निराधार मुलांचे संगोपन केंद्राचे सचिव विलास पंधारे यांनी केली आहे.
शिवाजीनगर येथे असलेल्या बालगृहातील १४ मुले २०१५मध्ये घोडेगावजवळील पळस्टीक येथे असलेल्या सह्याद्री आदिवासी ग्रामीण विकास प्रतिष्ठान, मंचर संचालित अनाथ निराधार मुलांचे संगोपन केंद्रात दाखल झाले. तेव्हापासून ही मुले विक्षिप्तासारखी वागत होती. विलास पंधारे यांनी सप्टेंबर २०१६मध्ये यातील प्रत्येक मुलाला विश्वासात घेऊन विचारले असता जिल्हा परिविक्षा आणि अनुसंरक्षण संघटना संचालित मुलांचे निरीक्षण बालगृह पुणे येथील शिक्षक व कर्मचारी हे लैंगिक शोषण व छळ करीत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. येथील शिक्षक व कर्मचारी मुलांना शाळेच्या ई-लर्निंगच्या हॉलमध्ये अश्लील चित्रफीत दाखवत, तर काही शिक्षक मोबाईलवरील अश्लील चित्रफीत दखवून मुलांवर लैंगिक अत्याचार करीत होते, ही माहिती त्यांना मिळाली व हा सर्व प्रकार ऐकून धक्का बसला.
विलास पंधारे यांनी याबाबत तेव्हा महिला व बाल कल्याण आयुक्त, जिल्हा समाजकल्याण अधिकारी, जिल्हाधिकारी पुणे यांना लेखी निवेदनाद्वारे हा प्रकार कळविला; मात्र त्याकडे कोणी लक्ष दिले नाही. ै त्यांनी घोडेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यास सांगितले. पुणे येथील बालगृहातील शिक्षक, कर्मचारी मुलांना बळजबरीने अश्लील चित्रफीत दाखवून, त्यांना मारहाण दमदाटी करून त्यांच्याकडून सुधारगृहातील गटारे व संडास साफ करून घेत. मुलांना फूस लावून या मुलांवर लैंगिक व शारीरिक अत्याचार केल्याची तक्रार दिली. घोडेगाव पोलिसांनी ही तक्रार दाखल करून घेतली व पुढील चौकशीसाठी शिवाजीनगर पोलीस ठाण्याकडे गुन्हा वर्ग केला.