वीरच्या सरपंच, ग्रामसेवकासह तलाठ्यावर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:12 AM2021-09-19T04:12:10+5:302021-09-19T04:12:10+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नीरा : वीर (ता. पुरंदर) येथील सरपंच ज्ञानदेव वचकल, ग्रामसेवक संजय म्हेत्रे, तलाठी नंदकुमार खरात, विजय ...

Crime on Talatha with Veer's Sarpanch, Gram Sevak | वीरच्या सरपंच, ग्रामसेवकासह तलाठ्यावर गुन्हा

वीरच्या सरपंच, ग्रामसेवकासह तलाठ्यावर गुन्हा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नीरा : वीर (ता. पुरंदर) येथील सरपंच ज्ञानदेव वचकल, ग्रामसेवक संजय म्हेत्रे, तलाठी नंदकुमार खरात, विजय रामचंद्र धुमाळ यांच्यासह मंडल अधिकारी सोमनाथ वांजळे व इतर एकावर सासवड पोलिसांनी फसवणुकीचा गंभीर गुन्हा दाखल केला आहे. अविनाश शंकर धुमाळ या पुणेस्थित फिर्यादींनी (मूळ गाव- वीर) याबाबत तक्रार दाखल केली आहे.

फिर्यादी अविनाश धुमाळ यांच्या तक्रारीनुसार वीर (ता. पुरंदर) येथील गट क्रमांक ६८० ही जमीन फिर्यादी अविनाश धुमाळ यांच्या आईने १९९२ साली विकत घेतली होती. या जमिनीत कूळ वहिवाट दाखवून ती बळकावण्याचा प्रयत्न विजय रामचंद्र धुमाळ यांचा अनेक वर्षांपासून सुरू होता. या जमिनीला कूळ लागू शकत नाही याबाबत १९९० साली महसूल विभागाचा आदेश झालेला असतानाही हा खटाटोप सुरू होता. विजय धुमाळ यांनी त्यासाठी सरपंच ज्ञानदेव वचकल व ग्रामसेवक संजय म्हेत्रे यांना हाताशी धरून या गटात कुठलेही घर किंवा बांधकाम नसताना दगडी बांधकामाचे घर असल्याची नोंद ग्रामपंचायत दप्तरी केली. पुढे या नोंदीचा आधार घेऊन विजय धुमाळ यांनी न्यायालयाचीसुद्धा फसवणूक केली.

सरपंच व ग्रामसेवक यांना प्रत्यक्ष जागेवर जाऊन दाखवले असता कुठलेही बांधकाम आढळून आले नाही. तरीदेखील अशी नोंद करण्यात आल्याने फिर्यादींनी गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर विजय धुमाळ यांनी बाहेरून गुंड आणून पहाटे बांधकाम करण्याचा प्रयत्न केला. हा सगळा बनाव उघड झाल्यानंतर ग्रामपंचायतीने ही नोंद रद्द केली, पण बनावट व बोगस कागदपत्र बनवून जागा लाटण्याचा प्रयत्न त्यातून उघड झाल्याने सासवड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप करीत आहेत.

चौकट –

*तालुक्यातील दुसरा धक्कादायक प्रकार*

कागदपत्रात फेरफार करण्याचा हा दुसरा प्रकार पुरंदर तालुक्यात उघडकीस आला आहे. अवघ्या आठवडाभरापूर्वी गराडे येथील एका प्रकरणात प्रांत कार्यालयाच्या आवारात आंदोलन केले होते. कागदपत्रात बदल करून जमिनी बळकावण्याचे धक्कादायक प्रकार तालुक्यात उघडकीस येत असल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Web Title: Crime on Talatha with Veer's Sarpanch, Gram Sevak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.