वीरच्या सरपंच, ग्रामसेवकासह तलाठ्यावर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:12 AM2021-09-19T04:12:23+5:302021-09-19T04:12:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सासवड : सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांचे सख्खे भाचे विजय रामचंद्र धुमाळ याने १९९२ ला खरेदी केलेल्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सासवड : सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांचे सख्खे भाचे विजय रामचंद्र धुमाळ याने १९९२ ला खरेदी केलेल्या शेतजमिनीवर बेकायदेशीरपणे ताबा मिळवून त्यावर खोटे बांधकाम दाखवून सरपंच आणि ग्रामसेवकाच्या मदतीने त्याची नोंद केली. त्यावर तलाठी, मंडलाधिकारी यांचे दाखले घेऊन विद्युत कनेक्शन घेतले. याबाबत जाब विचारला असता मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी वीरचे ग्रामसेवक, तलाठी तसेच मंडलाधिकारी तसेच बनावट कागदपत्रे करणारे अशा एकूण नऊजणांविरोधात सासवड पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातील मुख्य आरोपी विजय धुमाळ याला अटक करण्यात आली आहे.
याबाबत अविनाश शंकर धुमाळ (वय ३७. रा, सातारा रोड, पर्वती, पुणे. मूळ रा. वीर, ता. पुरंदर) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपी विजय रामचंद्र धुमाळ, ग्रामसेवक संजय म्हेत्रे, तलाठी नंदकुमार खरात, मंडल अधिकारी सोमनाथ दामोदर वांजळे, माऊली ऊर्फ ज्ञानदेव वचकल, रत्नप्रभा गोरख शिंदे, संगीता शांताराम भोसले, सोनू शांताराम भोसले, राजेश गोरख शिंदे आणि त्याच्या इतर साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी अविनाश धुमाळ यांची आई मालन शंकर धुमाळ यांनी वीर येथे जमीन गट क्रमांक ६८० हे क्षेत्र विकत घेतले आहे. आरोपी विजय धुमाळ याने गेल्या वर्षी अविनाश धुमाळ यांना कोणतीही नोटीस न देता परस्पर बेकायदेशीरपणे वारस नोंद करून घेतली. तसेच त्यावर कोणतेही बांधकाम नसताना २६ बाय ६० फूट दगडी बांधकाम असल्याचा ग्रामसेवक यांच्याकडून दाखला घेऊन ग्रामपंचायत दप्तरी नोंद केली. तसेच तलाठी आणि मंडलाधिकारी यांच्याकडून दाखले मिळविले.
त्यामुळे फिर्यादी अविनाश धुमाळ यांनी सरपंच, ग्रामसेवक, तलाठी तसेच गटविकास अधिकारी यांना अर्ज करून रीतसर चौकशीची मागणी केली. सरपंच, तलाठी, ग्रामसेवक यांनी जागेची पाहणी केली असता कोणतेही बांधकाम आढळून आले नाही. त्यानंतर गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशावरून जुलै महिन्यात चौकशी लावली. मात्र, सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांनी पुणे, मुंबई येथून ४० ते ५० लोकांना पाठवून रात्रीत बांधकाम करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पहाटेच कंट्रोल रूमला फोन करून बांधकाम थांबविण्यात आले. त्यानंतर ग्रामपंचायत चौकशी होऊन या बांधकामाची नोंद रद्द करण्यात आली. त्यावेळी आरोपी आणि त्याच्या घरातील इतरांनी धुमाळ यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकीही दिली. त्यामुळे धुमाळ यांनी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत. पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक सुप्रिया दुरंदे पुढील तपास करीत आहेत.