बांधकाम व्यावसायिक आदित्य दाढे यांच्यावर कोथरुड पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2021 07:08 PM2021-03-03T19:08:57+5:302021-03-03T19:13:23+5:30
कोथरुड येथील जमीन प्रकरणात बनावट कागदपत्रे दाखल करुन फसवणूक केल्याच्या आरोपावरुन राजेश बजाज यांना अटक करण्यात आली होती.
पुणे : कोथरुड येथील जमीन प्रकरणात बनावट कागदपत्रे दाखल करुन फसवणूक केल्याच्या आरोपावरुन राजेश बजाज यांना अटक करण्यात आली होती. मात्र, ते हस्ताक्षर बजाज यांचे नसल्याचा अहवाल सीआयडीने दिला. मात्र, दरम्यानच्या काळात दोन महिने बेकायदा अटकेत राहावे लागल्याने आपली बेअब्रु झाल्याचा दावा बजाज यांनी केला. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कोथरुड पोलिसांनी बांधकाम व्यावसायिक आदित्य दाढे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबतची माहिती अशी, राजेश खैरातीलाल बजाज (वय ५८, रा. एरंडवणा) यांचे वडिल व काका यांनी ८ एप्रिल १९८६ रोजी नोंदणीकृत खरेदीखता अन्वये कोथरुडमधील १०० फुटी डी पी रोडजवळील जमीन विकत घेतली होती. या जागेवरुन बजाज आणि दाढे यांच्या वाद निर्माण झाला होता.
फिर्यादीचे काकांच्या नावे या मिळकतीच्या अनुशंगाने हक्क सोड पत्र ३० मे १९८८ रोजी फिर्यादी यांनी बनावट तयार केले, म्हणून त्यांच्याविरुद्ध बांधकाम व्यावसायिक आदित्य दाढे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात १२ जून २०१६ मध्ये फिर्याद दिली होती. त्यावरुन पोलिसांनी राजेश बजाज यांना ऑक्टोंबर २०१७ मध्ये अटक केली होती. दरम्यान, ज्या हक्क सोडपत्र बजाज यांनी बनावट तयार केल्याचा आरोप होता. ते हक्क सोडपत्र राज्य गुन्हे अन्वेषण (सीआयडी)मधील हस्ताक्षर तज्ञांकडे पाठविण्यात आले. त्यांचा अहवाल व अभिप्राय मागविले. फिर्यादीचे हस्ताक्षर हे त्यांच्या काकांच्या हक्क सोड पत्राशी जुळत नाही असा स्पष्ट अभिप्राय दिला. आरोपींने फिर्यादीचे विरुद्ध दाखल केलेल्या एफआयआरमुळे बजाज यांना दोन महिने बेकायदेशीर अटकेत राहावे लागले. या सर्व प्रकारामुळे फिर्यादी व त्यांच्या कुटुंबियांना शारीरिक, मानसिक त्रास तसेच बेअब्रु व्हावे लागले. असे फिर्यादीत म्हटले आहे. बजाज यांच्या फिर्यादीवरुन बांधकाम व्यावसायिक आदित्य दाढे यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.