Video देशातील महिलांची फसवणूक केली म्हणून पंतप्रधानांवर गुन्हाच दाखल करायला हवा : राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकरांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2021 03:19 PM2021-09-04T15:19:51+5:302021-09-04T15:53:35+5:30
गॅस दरवाढीवरून राष्ट्रवादी आणि काँग्रेस आक्रमक; पंतप्रधानांना पाठवल्या चक्क गोवऱ्या अन् लाकडं
पुणे: पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलेंडरच्या किमतीत गेल्या काही महिन्यात उच्चांकी वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. एकीकडे कोरोनामुळे आर्थिक कंबरडे मोडले असताना सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला वाढत्या इंधन दरवाढीमुळे चांगलाच भुर्दंड बसत आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यात राष्ट्रवादी आणि काँग्रेस आक्रमक झाली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्यामहिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी देशातील महिलांची फसवणूक केल्या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर गुन्हाच दाखल करायला हवा अशा शब्दात जोरदार टीका केली आहे.
राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या वतीने गॅस सिलेंडर दरवाढ व एकूणच महागाईच्या विरोधात पुण्यात शनिवारी ( दि. ४ ) दोन वेगवेगळी आंदोलनं करण्यात आली. राष्ट्रवादी महिला आघाडीने रक्षा बंधनाची भेट म्हणून पंतप्रधानांना चक्क गोवऱ्या तर काँग्रेस महिला आघाडीने लाकडं पाठवण्यासाठी म्हणून जिल्हाधिकाऱ्याकडे सुपूर्द केली. निवासी जिल्हाधिकारी जयश्री कटारे यांच्याकडे पंतप्रधानांना पाठवण्यासाठी म्हणून लाकडाचे तुकडे देण्यात आले.
देशातील महिलांची फसवणूक केली म्हणून पंतप्रधानांवर गुन्हाच दाखल करायला हवा; राष्ट्रवादीच्या रूपाली चाकणकरांची टीका.#FuelPriceHike#PMModi#NCP#Punepic.twitter.com/ba1nzuaOCe
— Lokmat (@MiLOKMAT) September 4, 2021
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर म्हणाल्या, उज्ज्वला गॅससारख्या योजनेची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली व प्रत्यक्षात मात्र गँसचे दर गगनाला नेऊन भिडवले. खरे तर देशातील महिलांची फसवणूक केली म्हणून पंतप्रधानांवर गुन्हाच दाखल करायला हवा अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी केली. दर आठ - पंधरा दिवसांनी स्वयंपाकाच्या गॅसची किंमत वाढवून मोदी देशातील भगिनींना रक्षाबंधनाची ओवाळणी घालत आहेत. त्यामुळेच आता त्यांना रिटर्न गिफ्ट म्हणून आम्ही शेणाच्या गोवऱ्या पाठवत आहोत.
सिटी पोस्ट चौकात झालेल्या या आंदोलनात महापालिकेतील.विरोधी पक्ष नेत्या दिपाली धुमाळ, शहराध्यक्षा मृणालिणी वाणी, तसेच अनिता पवार, पुनम पाटील, भावना पाटील, मीना पवार, नीता गलांडे, ज्योती सुर्यवंशी, सुनिता डांगे व अन्य महिला सहभागी झाल्या होत्या. तर काँग्रेस महिला आघाडीने जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन केले. शहराध्यक्ष सोनाली मारणे, शर्वरी गोतरणे, छाया जाधव, राजश्री अडसूळ, संगीता पवार, शिवानी माने अन्य महिला यात सहभागी होत्या. मारणे यांनी सांगितले की, सामान्य नागरिकांना गॅस महागल्यामुळे आता पुन्हा लाकडांवर स्वयंपाकाची वेळ आली.