क्रिकेट सामन्यात जल्लोश, जिल्हा परिषद सदस्यासह १५ जणांवर गुन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:10 AM2021-03-23T04:10:46+5:302021-03-23T04:10:46+5:30
कोरेगाव भीमा : श्रीक्षेत्र वढू बुद्रुक येथे सुरु असलेल्या धर्मवीर संभाजीराजे करंडक २०२१ स्पर्धेच्या दरम्यान विजयी संघाने ...
कोरेगाव भीमा :
श्रीक्षेत्र वढू बुद्रुक येथे सुरु असलेल्या धर्मवीर संभाजीराजे करंडक २०२१ स्पर्धेच्या दरम्यान विजयी संघाने ठिकाणी डीजे वाजवून विनामास्क आनंदोत्सव साजरा करून जिल्हाधिकाऱ्यांच्याच आदेशाला लोकप्रतिनिधींनीच केराची टोपली दाखविल्याने शिक्रापूर पोलिसांनी पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या सविता बगाटे यांच्यासह तब्बल पंधरा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
जानेवारी महिन्यापासून पुणे जिल्ह्यासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात क्रिकेटचे सामने भरविण्याचे पेव मोठ्या प्रमाणात सुटू लागले आहे. सध्या राज्यात कोरोनाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले असतानाच कोरोनाचा प्रसार वाढू नये यासाठी जिल्हाधिकाऱ्या मोठ्या प्रमाणावर निर्बंध घातले असूनही त्याची कडक अंमलबजावणी होताना दिसत नाही. वढू बुद्रुक येथे सुरु असलेल्या धर्मवीर संभाजी राजे करंडक २०२१ स्पर्धा सुरु असताना आयोजकांनी शेवटचा सामना हा भैरवनाथ स्पोर्ट्स क्लब पाबळ व घनोबा स्पोर्ट्स क्लब धानोरे यांच्यात झाला. यात पाबळ येथील भैरवनाथ स्पोर्ट्स क्लब पाबळ या संघ विजयी झाल्याने संघाचे संघमालक विकास गायकवाड यांनी सदर ठिकाणी डीजे वाजवून संघातील खेळाडूंसह आनंदोत्सव साजरा केला. दरम्यान, या संघाला शुभेच्छा देण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या सविता बगाटे या वेळी उपस्थित झाल्या होत्या. या वेळी येथे कोणीही मास्क लावलेले नव्हते, तसेच गर्दी केलेली होती. येथे सर्वांनी विनामास्क आनंदोत्सव साजरा करून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचे समोर आले. याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस शिपाई प्रतीक भाऊसाहेब जगताप यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने शिक्रापूर पोलिसांनी जिल्हा परिषदेच्या सदस्या सविता बगाटे यांच्यासह तब्बल पंधरा ते वीस जणांवर गुन्हे दाखल केले. पुढील तपास पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार पंडित मांजरे करत आहे.