आघाडीच्या नेत्यांवरील गुन्हयांना पाठीशी घातलं जातंय; रघुनाथ कुचिकला तात्काळ अटक करा-तृप्ती देसाई
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2022 03:47 PM2022-02-17T15:47:26+5:302022-02-17T15:47:34+5:30
गुन्हा अत्यंत गंभीर असून पीडित महिलेला लवकरात लवकर न्याय मिळावा
पुणे : लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीशी शारीरीक संबंध करुन तिला गरोदर केले. तसेच जबरदस्तीने गर्भपात करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी कामगार नेते आणि शिवनेतेचे उपनेता याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा अत्यंत गंभीर असून पीडित महिलेला न्याय मिळावा यासाठी रघुनाथ कुचिक यांना तात्काळ अटक करणे गरजेचे आहे. अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी प्रशासनाकडे केली आहे.
''याआधी महाविकास आघाडीतील नेते आणि मंत्र्यांवर गुन्हे दाखल झाले होते. परंतु त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला गेला. राज्य महिला आयोगाने दखल घेऊन कारवाईचे आदेश देणे गरजेचं असल्याचे यावेळी त्या म्हणाल्या आहेत.''
''चोवीस वर्षीय महिलेशी वारंवार पुणे आणि गोवा येथे बलात्कार करून संबंधित महिलेचा गर्भपात करून तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा पुणे शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे दाखल झालेला आहे. हा गुन्हा अत्यंत गंभीर असून पीडित महिलेला न्याय मिळावा यासाठी रघुनाथ कुचिक यांना तात्काळ अटक करणे गरजेचे आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.''
काय आहे प्रकरण?
रघुनाथ कुचिक हे कामगार क्षेत्रात कार्यरत असून शिवसेनेचे उपनेते आहेत़. त्याने महिलेशी प्रेमसंबंध निर्माण करुन लग्नाचे आमिष दाखवले. तिच्यासोबत वेगवेगळ्या ठिकाणी शारीरीक संबंध प्रस्थापित केले. त्यातून त्या गरोदर राहिल्या. तेव्हा त्यांची संमती नसताना जबरदस्तीने गर्भपात करुन तसेच या बद्दल कोणाला काही सांगितले तर तुला मारुन टाकील, अशा धमक्या दिल्या आहेत.तसेच फियार्दी यांची तब्येत ठीक नसताना महिलेकडून समजूतीचे करारनाम्यावर सह्या करुन घेतली आहे.