...आणि त्याचा बदला घेणाऱ्यावर गुन्हे? ही लोकशाही आहे का? रुपाली पाटील यांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2022 02:44 PM2022-12-11T14:44:35+5:302022-12-11T14:45:25+5:30
महापुरुषांच्या बद्दल बेताल वक्तव्य केले त्यांच्यावर कारवाई केली असती तर शाई फेकली गेली नसती
पुणे: चंद्रकांत पाटील यांनी नुकतेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांनी देणगी मागून म्हणजेच भीक मागून शाळा चालवल्याचे वादग्रस्त विधान केले होते. तर भाजप मधील नेत्यांकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल वारंवार वादग्रस्त विधाने केली जात आहेत. असे असताना त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. याचा राग मनात धरून काही कार्यकर्त्यांनी चिंचवड येथे सहा वाजण्याच्या सुमारास चंद्रकांत पाटील यांच्या अंगावर शाई फेकली. त्यानतंर पोलिसांनी शाई फेकणाऱ्या मनोज गरबडेसह तीन कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. त्यावर रुपाली पाटील - ठोंबरे यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून सवाल उपस्थित केला आहे. महापुरुषांचा अपमान करणाऱ्या व्यक्तीला संरक्षण व त्याचा बदला घेणाऱ्यावर गुन्हे? ही लोकशाही आहे का? असे त्या म्हणाल्या आहेत.
शाहीफेक करणाऱ्या मनोज गरबडेसह ताब्यात घेतलेल्या दोन जणांची चौकशी पोलिसांकडून सुरू आहे. तो पिंपरी-चिंचवड परिसरात समता सैनिक दलासाठी काम करणारा कार्यकर्ता म्हणून परिचित आहे. डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त समता सैनिक दलाकडून आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांमध्ये त्याचा पुढाकार असतो. नुकतीच मनोजच्या पुढाकाराने पिंपरीत संविधान जनजागृती अभियान, तसेच सहा डिसेंबरला रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
पाटील म्हणाल्या, सरकार मध्ये असून महापुरुषांच्या बद्दल बेताल वक्तव्य केले त्यांच्यावर कारवाई केली असती तर शाई फेकली गेली नसती. त्याचे पूर्ण व्हिडीओ फुटेज सगळीकडे आहेत. तरीही सरकार कडून खोटे 307,353 सारखे गंभीर गुन्हे दाखल करून सत्तेचा गैरवापरच करत आहे. शाई फेकली त्याचे जे गुन्हे दाखल होतील ते दाखल करावे सत्तेचा माज दाखवू नये. सत्तेचा माज हा जनता टिकवून देत नसते हे लक्षात ठेवावे.
राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक झाल्यानंतर पिंपरी -चिंचवड पोलीस दलातील १० जणांचे निलंबन करण्यात आले आहे. त्यावर पाटील म्हणाल्या, ईडी सरकारने तसेच निर्दोष पोलीस बांधव यांच्यावर निलंबनाची केली. त्यांच्या नेत्यांनी महापुरुषांच्या बाबतीत बेताल बोलायचे आणि आमच्या पोलिसांनी त्यांना संरक्षण द्यायचे देऊ दया त्याचे काम आहे. पण लोकांच्या भावांनाना आपल्या महापुरुषाच्या बद्दल बोलल्याने उद्रेक झाला तर पोलीस तरी करणार काय? पोलिसांचे निलंबित मागे घेऊन, बदली करावी. ईडी सरकार जनता ,पोलीस यांच्यावर अन्याय करत आहे सत्तेचा माज दाखवण्यापेक्षा सत्ताधारी म्हणून काम करा अन्यथा खुर्च्या खाली करा कपटीवृत्ती, बेताल सत्ताधारीने चाले जावं. असं इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.