Devendra Fadnavis: गुन्हे घडताहेत; पण पोलीस लगेच कारवाईही करतायेत - देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 09:49 IST2025-01-10T09:48:28+5:302025-01-10T09:49:53+5:30

गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा वाढवण्याचा आमचा विचार आहे

Crimes are happening; but the police are taking immediate action - Devendra Fadnavis | Devendra Fadnavis: गुन्हे घडताहेत; पण पोलीस लगेच कारवाईही करतायेत - देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis: गुन्हे घडताहेत; पण पोलीस लगेच कारवाईही करतायेत - देवेंद्र फडणवीस

पुणे : गुन्हेगारी स्वरूपाची कृत्य होत आहेत हे खरे आहे; पण सर्वसाधारणपणे अशा घटना घडल्यावर पोलिस लगेच कारवाई देखील करत आहेत, अशा शब्दांमध्ये बीड प्रकरणाचा थेट उल्लेख न करता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात गुन्हेगारी घटना वाढत असल्याचे मान्य केले. सीसीटीव्ही नेटवर्क वाढवून आम्ही यावर नियंत्रण मिळवत आहोत, असेही त्यांनी सांगितले.

पुण्यात गुरुवारी सायंकाळी एका कार्यक्रमासाठी आले असताना फडणवीस यांनी पत्रकारांबरोबर संवाद साधला. बीड प्रकरण व राज्यात एकूणच वाढलेल्या गुन्हेगारीकडे त्यांचे लक्ष वेधले असता त्यांनी गुन्हे वाढल्याचे अप्रत्यक्षपणे मान्यच केले. ते म्हणाले, काही गोष्टी घडत आहेत हे खरे आहे; पण म्हणून वाढ झाली असे म्हणता येणार नाही. अशा प्रकरणात पोलिस तातडीने कारवाई करतात. आरोपींना अटक होते, असेही होत आहे. सीसीटीव्ही यंत्रणा वाढवण्याचा आमचा विचार आहे. त्यामुळे यावर नियंत्रण मिळेल.

सरकारचा पुढील १०० दिवसांचा कार्यक्रम आम्ही निश्चित केला आहे. प्रत्येक विभागाला काय करायचे ते निश्चित करून दिले आहे, असे फडणवीस यांनी सांगितले. पुण्यासाठी नियोजित पुरंदर विमानतळ महत्त्वाचा आहे. सध्याच्या विमानतळाचा आम्ही विस्तार केला. या विस्ताराचा उपयोग होत आहे. पुरंदर विमानतळासाठी कालच बैठक घेतली. भूसंपादनाची गती वाढवा असे अधिकाऱ्यांना सांगितले आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

महाराष्ट्रात विदर्भ असेल किंवा मराठवाडा असेल तिकडचा दुष्काळ संपवण्याकरता आपण चार नदी जोड प्रकल्प हातात घेतले आहेत. त्याच्या चार निविदाही निघाल्या आहेत. त्याला वेळ लागेल, पण एकदा ते प्रकल्प पूर्ण झाले की महाराष्ट्रातला दुष्काळ संपेल, असा विश्वासदेखील फडणवीस यांनी व्यक्त केला.

Web Title: Crimes are happening; but the police are taking immediate action - Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.