शहरात ध्वनी प्रदुषणाचे ९८ मंडळांवर गुन्हे दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2018 09:29 PM2018-09-24T21:29:52+5:302018-09-24T21:36:35+5:30
शहरातील गणेश विसर्जन मिरवणुकीत ध्वनी प्रदुषण करणाऱ्या ९८ मंडळांवर कारवाई करण्यात आली असून ५२ प्रकरणात मंडळांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे़.
पुणे : शहरातील गणेश विसर्जन मिरवणुकीत ध्वनी प्रदुषण करणाऱ्या ९८ मंडळांवर कारवाई करण्यात आली असून ५२ प्रकरणात मंडळांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे़. बहुतांश मंडळांनी उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन केले़ अनेकांनी स्पिकरच्या भिंती उभारल्या. मात्र, पोलिसांच्या आवाहनानंतर स्पिकर वाजविला नसल्याचे पोलीस आयुक्त डॉ़. के़. व्यंकटेशम यांनी सांगितले़.
ध्वनी प्रदुषणाबाबत उच्च न्यायालयाने आदेश देऊन डीजेला बंदी घातली होती़. त्यामुळे विसर्जन मिरवणुकीच्या अगोदर अनेक मंडळांनी मिरवणुकीवर बहिष्कार घालून मूर्ती मांडवात ठेवण्यात येणार असल्याच इशारा दिला होता़.त्यामुळे यंदाच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते़. न्यायालयाच्या आदेशाकडे दुर्लक्ष करीत अनेकांनी डीजेचा दणदणाट सुरु ठेवला होता़. तर काही मंडळांनी साध्या पद्धतीने स्पिकर लावून विसर्जन मिरवणुकीत सहभाग घेतला होता़.
परंतु, पोलिसांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन या ९० हून अधिक मंडळांनी आपल्या मंडळाची मिरवणुक काढून विसर्जन केले़. तसेच मागील वर्षांपेक्षा यंदा विसर्जन मिरवणूकीची जवळपास दीड तास अगोदर सांगता झाली़.
याबाबत पोलीस आयुक्त डॉ़. व्यंकटेशम यांनी सांगितले की, पोलिसांनी अगदी सह आयुक्तांपासून पोलीस निरीक्षकांपर्यंत सर्वांनी वेळोवेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधून गणेशोत्सव शांततेत पार पडावा यासाठी सहकार्याची भूमिका घेतली होती़. पोलिसांच्या आवाहनाला मंडळांनी प्रतिसाद दिला़. अतिरिक्त पोलीस आयुक्त रवींद्र सेनगांवकर, पोलीस उपायुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त सुहास बावचे यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने सुक्ष्म नियोजन केले होते़ त्याचबरोबर अन्य अतिरिक्त पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त यांनी कोणी कोठे, किती बंदोबस्त नेमायचा, कोणाशी चर्चा करायची याचे अतिशय बारकाईने नियोजन केले होते़. त्यामुळे गेल्या ५ ते ६ वर्षांपेक्षा यंदा लवकर व त्यामानाने शांततेत विसर्जन मिरवणुक पार पाडण्यात पोलिसांना यश मिळाले़. पुणेकर, स्वयंसेवी संस्था, विघ्नहर्ता न्यास, निरंजन संस्था व अन्य स्वयंसेवक यांच्या सहकार्याने ही विसर्जन मिरवणुक शांततेत पार पडण्यात पोलिसांना यश आले आहे़.
़़़
चांगले माणूस, आमचे मित्र
पोलिसांनी कार्यकर्त्यांशी संपूर्ण गणेशोत्सवात संवाद ठेवला होता़. ज्यांनी या संवादाला प्रतिसाद दिला़. ते चांगले माणूस आमचे मित्र आहेत़. ज्यांनी नियमभंग केला़ त्यांच्यावर कारवाई केली जाईल़. काही ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़. पोलिसांनी व्हिडिओ शुटींग करुन घेतले आहे़. ते पाहून त्यात गुन्हा होत असेल तर यापुढेही गुन्हे दाखल होतील़. डीजे लावणाऱ्या मंडळांवर गुन्हे दाखल करुन पुढील कारवाई करण्यासाठी अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे यांना नोडल अधिकारी म्हणून नियुक्त केले आहे़.
..................
पुणेकरांचे आभार
सर्व पुणेकर, सर्व स्वयंसेवक, सामाजिक संस्था ज्यांनी ज्यांनी ही विसर्जन मिरवणुक शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य केले़, त्या सर्वांचे आभाऱ, यासाठी या गणेशोत्सवाचा अनुभव एकत्र करुन पुढील वर्षी कमी पोलीस दलात अधिक चांगला बंदोबस्त करु़.
डॉ़. के़. व्यंकटेशम, पोलीस आयुक्त़