भाडेतत्वावर गाड्या घेऊन अनेकांना गंडा घालणार्या दोघांवर वानवडी, वारजे, हवेलीत गुन्हे दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 11:49 AM2021-06-10T11:49:22+5:302021-06-10T11:49:30+5:30
मेट्रो व इतर कंपन्यांमध्ये भाडेतत्वावर मोटारी लावतो, असे सांगून गाड्या घेेणाऱ्या आणि त्यांची परस्पर विक्री करण्याचा प्रकार समोर...
पुणे : मेट्रो व इतर कंपन्यांमध्ये भाडेतत्वावर मोटारी लावतो, असे सांगून गाड्या घेेणाऱ्या आणि त्यांची परस्पर विक्री करण्याचा प्रकार समोर आला असून त्यातून अनेकांची फसवणूक झाली आहे. या प्रकरणी वानवडी, वारजे, हवेली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. भाडे तर नाही़ उलट गाडी परस्पर दुसर्याला विकली. आता फायनान्स कंपनीचा हप्ते भरण्यासाठी तगादा अशी अनेकांची अवस्था झाली आहे.
नमन सहानी (वय ३८, रा. स्काय वॉटर अपार्टमेंट, वानवडी) आणि कल्पेश पंगलेकर (रा. पुणे) अशी या दोघांची नावे आहेत. या दोघांना चिंचवड पोलिसांनी अटक केल्यानंतर हा सर्व प्रकार पुढे आला असून फसवणुक केलेल्या काही गाड्या चिंचवड पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
याप्रकरणी विकास साठे (वय २४, रा. हांडेवाडी) यांनी वानवडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. नमन सहानी हा मध्यस्थ एजंट म्हणून काम करतो़ त्याने फिर्यादी यांना दरमहा २५ हजार रुपये भाडे बँकेत जमा होईल, असा करार करुन घेऊन जानेवारी २१मध्ये त्यांच्याकडील ७ लाखांची मोटार आपल्या ताब्यात घेतली. त्यानंतर त्याने ती गाडी परस्पर दुसर्यांना विकली. फिर्यादी यांना १ लाख रुपये भाडेही दिले नाही. तसेच त्यांचे मित्र रामसिंग सुरजवंशी यांची मोटारही त्याने परस्पर विकली. चिंचवड पोलिसांनी या मोटारी जप्त केल्या आहेत.
निखील काळभोर (वय ३३, रा. कर्वेनगर) यांनी वारजे पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांची कार मेट्रोच्या कामात भाडेतत्वावर लावतो, असे सांगून भाडेकरार करुन त्यांच्याकडून कल्पेश पंगेरकर याने मोटार ताब्यात घेतली. ठरल्याप्रमाणे भाडे न देता ही कार परस्पर दुसर्याला विक्री करुन फिर्यादीची १० लाख रुपयांची फसवणूक केली. अशाच प्रकारे हवेली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांनी अनेकांची फसवणूक केली आहे.