उद्योगनगरीतील भाईगिरीचा प्रवास फेसबुक, यू-ट्यूब व्हाया ‘टिकटॉक’
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2019 01:46 PM2019-05-17T13:46:46+5:302019-05-17T13:47:15+5:30
टिकटॉक मधून धारदार शस्र हातात घेऊन दहशत निर्माण करण्याचाच प्रयत्न केला गेला .. आणि मग पोलिसांनी यांना खाक्या वर्दीचा '' करंट '' दिला
- नारायण बडगुजर-
पिंपरी : चित्रपटांतील डायलॉग, गाणी यासह आपला फोटो किंवा व्हिडीओ फेसबुक आणि यू-ट्यूबवर शेअर किंवा अपलोड करण्याची क्रेझ तरुणांना आता ‘टिकटॉक’कडे आकर्षित करीत आहे. त्याचाच परिणाम म्हणून टिकटॉक व्हिडीओद्वारे दहशत पसरवणाऱ्या तरुणांवर गुन्हा दाखल होऊ लागले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात सलग दुसऱ्या दिवशी बुधवारी चार तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
फेसबुक, यू-ट्युबसह विविध अॅप्स सध्या उपलब्ध झाले आहेत. यात ‘टिकटॉक’ लोकप्रिय आहे. त्यातही तरुणांमध्ये या अॅपची क्रेझ आहे. यात चित्रपटातील डायलॉग किंवा गाण्यांचा वापर करून व्हिडीओ तयार करता येतो. संबंधित वापरकर्त्याला यात केवळ अभिनय करायचा असतो. स्मार्ट फोनच्या साह्याने असा व्हिडिओ शूट करता येतो. त्यामुळे ‘टिकटॉक’ अॅप असलेल्या कोणत्याही स्मार्टफोनचा वापर करून अशी व्हिडीओ क्लिप तयार करता येते. मात्र, असे करताना अनेक जण कायद्याचे उल्लंघन होईल, अशा पद्धतीने व्हिडीओ तयार करतात. परिणामी त्यांच्यावर गुन्हा दाखल होतो. यात किशोरवयीन मुलांचा किंवा तरुणांचा अधिक समावेश आहे.
‘टिकटॉक’ला सध्या अधिक पसंती आहे. कारण त्यावरील व्हिडीओ ‘व्हॉट्स अॅप’वर शेअर करता येतो. त्यामुळे तो व्हिडीओ सहज डाऊनलोडही होतो आणि सहज बघताही येतो. तसेच संबंधित व्यक्ती किंवा ‘व्हॉट्स अॅप’च्या ग्रुपवर असा व्हिडीओ सुलभतेने फॉरवर्ड करता येतो. स्मार्टफोन तसेच काही बेसिक फोनमध्येही ‘व्हॉट्सअॅप’ वापरता येते. तसेच फेसबुक किंवा यू-ट्युबवरही ‘टिकटॉक’चे व्हिडीओ अपलोड केले जातात.
.....
फिल्मी नावाने प्रोफाइल
दहशत पसरविण्याच्या प्रयत्नात असलेल्या तरुणांचे सोशल मीडियावर स्टायलिश फोटो दिसून येतात. रागाने पाहताना, बोट दाखवून वेगवेगळे हातवारे करतानाचे फोटोही त्यांच्याकडून शेअर केले जातात. हातात लाकडी दांडके, तलवार, कोयता आदी हत्यारे घेऊन काढलेले फोटो किंवा व्हिडीओ शेअर होत असल्याचे दिसून येते. राजा, किंगमेकर, डॉन, भाई आदी फिल्मी नावाने प्रोफाइल ठेवून असे तरुण सोशल मीडियात भाईगिरी करीत असल्याचे दिसून येते.
.....
डायलॉगबाजीतून दहशतीचा प्रयत्न
काही तरुण चित्रपटातील नायक किंवा खलनायकाप्रमाणे डायलॉगबाजी करतात. यातून आपले प्रस्थ मोठे असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न केला जातो. तसेच आपल्या नादाला कोणी लागू नये, अशा समजातून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यासाठी सोशल मीडियावर अशा तरुणांचा मोठा वावर आहे. यातील काही तरुण एकत्र येऊन सोशल मीडियावर त्यांचा ग्रुप असल्याचे दिसून येते.
.............