पिस्टल अन् काडतुसांसह सराईत गुन्हेगाराला अटक, उत्तमनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत कारवाई
By नितीश गोवंडे | Published: March 30, 2024 05:34 PM2024-03-30T17:34:55+5:302024-03-30T17:36:42+5:30
उत्तमनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील इंगळे कॉर्नर येथील मोकळ्या गार्डनमध्ये केली...
पुणे : सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने एकाला३ अटक केली आहे. त्याच्याकडून एक पिस्टल व दोन काडतुसे असा ४० हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवारी (दि. ३०) उत्तमनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील इंगळे कॉर्नर येथील मोकळ्या गार्डनमध्ये केली. सागर गणेश सुतार (२३ रा. गणपती माथा वारजे, पुणे) असे अटक केलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.
खंडणी विरोधी पथक एकचे पोलिस अंमलदार प्रफुल चव्हाण व सहायक पोलिस फौजदार संजय भापकर त्यांना माहिती मिळाली की, उत्तमनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत इंगळे कॉर्नर येथील एका हॉटेलच्या मोकळ्या जागेत एक जण थांबला असून त्याच्याकडे पिस्टल आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे खंडणी विरोधी पथक एकच्या पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला एक पिस्टल व दोन जिवंत राऊंड असा ४० हजार २०० रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला. त्याच्याविरुद्ध वारजे माळवाडी तसेच उत्तमनगर पोलिस ठाण्यात विविध गुन्हे दाखल आहेत. पुढील तपासासाठी त्याला उत्तमनगर पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कामगिरी गुन्हे शाखेचे अपर पोलिस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलिस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक पोलिस आयुक्त, गुन्हे शाखा १ सुनील तांबे व खंडणी विरोधी पथक एकचे पोलिस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक अभिजीत पाटील, सहायक पोलिस फौजदार प्रवीण ढमाळ, संजय भापकर, नितीन कांबळे, विजय कांबळे, प्रफुल्ल चव्हाण, अमर पवार यांच्या पथकाने केली.