गुंडांकडून शेतकरी आठवडे बाजारात शेतकऱ्यांना मारहाण ; पोलीस म्हणतात किरकोळ प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2019 09:18 PM2019-02-04T21:18:23+5:302019-02-04T21:22:27+5:30
बाणेर येथील आठवडे बाजारात भाजीपाला विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना गुंडांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिली़
पुणे : बाणेर येथील आठवडे बाजारात भाजीपाला विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना गुंडांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिली़, तसेच बाजारातील शेतकऱ्यांना धमकी दिली की जर तुम्ही कोणी मध्ये पडला तर तुम्हाला पुण्यात येऊ देणार नाही,ही घटना बाणेर येथील गणराज चौकातील आठवडे बाजारात रविवारी दुपारी घडली़ चतु:श्रृंगी पोलिसांनी या घटनेची अदखलपात्र गुन्हा (एन सी) नोंद केली़.
याबाबत चतु:श्रृंगी पोलिसांना विचारले असता वरिष्ठ पोलीस निरीक्षक दयानंद ढोमे यांनी सांगितले की, हा किरकोळ प्रकार आहे. त्यावर शेतकऱ्यांना मारहाण करुन इतरांनी मध्ये पडू नये, म्हणून धमकी देणे हा किरकोळ आहे का असे विचारल्यावर आम्ही उद्या चौकशी करतो, असे त्यांनी सांगितले. याबाबत मिळालेली माहिती अशी, की कोरडवाहू उत्थान फार्मर प्रोडयुसर कंपनीच्या वतीने बाणेर येथील गेरा सोसायटीच्या परिसरात दर रविवारी दुपारी ३ ते ९ या दरम्यान आठवडे बाजराचे आयोजन करते. रविवारी आठवडे बाजाराचे आयोजन करीत असताना लोणी काळभोर येथील काही जणांनी बाजार आयोजक सागर उरमुडे यांना तुम्ही स्वत: बाजार चालवता, तुम्ही कंपनी सभासद नाही़ त्यामुळे तुम्ही आमच्या बाजारात भाजीपाल विक्री करु नये असे म्हणून त्यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली व बाजारातील इतरांना कोणी मध्ये पडला तर तुम्हाला पुण्यामध्ये येऊ देणार नाही़, तुम्ही नगरमधून येऊन आमच्या पोटावर पाय देता तुम्हाला पुन्हा नगरला पाठवू अशी धमकी दिली़.
याप्रकरणी कोरडवाहू उत्थान फार्मर प्रोडयुसर कंपनीच्या सुमारे ३० हून अधिक सभासदांनी या प्रकाराबाबत चतु:श्रृंगी पोलिसांकडे संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे़
याबाबत सागर उरमुडे यांनी सांगितले की, महापालिका आणि पणन विभागाच्या सहकार्याने आम्ही हा आठवडे बाजार चालविण्यास परवानगी दिली असताना हा प्रकार घडला आहे. मात्र, पोलिसांनी केवळ अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली असे त्यांनी सांगितले.