जितेंद्र जगताप यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी बिल्डर, नगरसेवक यांच्यावर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2018 04:26 PM2018-06-03T16:26:18+5:302018-06-03T16:26:18+5:30
सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र जगताप यांच्या आत्महत्येप्रकरणी पुणे महापालिकेतील राष्ट्रवादीचे नगरसेवक दिपक मानकर, बांधकाम व्यावसायिक सुधीर कर्नाटकी व विनोद भोळे यांच्यावर लोहमार्ग पोलिस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे : सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र जगताप यांच्या आत्महत्येप्रकरणी पुणे महापालिकेतील राष्ट्रवादीचे नगरसेवक दिपक मानकर, बांधकाम व्यावसायिक सुधीर कर्नाटकी व विनोद भोळे यांच्यावर लोहमार्ग पोलिस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आत्महत्येपुर्वी जगताप यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत त्यांची नावे आहेत.
याप्रकरणी त्यांचा मुलगा जयेश जितेंद्र जगताप (वय 28, घोरपडे पेठ) यांनी लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तो शुन्य क्रमांकाने समर्थ पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. जितेंद्र जगताप यांनी शनिवारी दुपारी घोरपडी येथे रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जितेंद्र जगताप यांच्या ताब्यात रास्ता पेठेत समर्थ पोलिस ठाण्यासमोर असलेली 481 रास्ता पेठ येथील जमीन आहे. या जमीनीबाबत दिपक मानकर व त्यांचे व्यावसायिक भागीदार सुधीर कर्नाटकी यांच्या ताब्यात असलेल्या व देखभाल करत असलेल्या या जमीनीबाबत मागील दहा ते बारा वर्षांपासून व्यवहार सुरु आहेत. दरम्यान या जमिनीचा ताबा मिळावा म्हणून जगताप यांच्यासोबत मानकर व कर्नाटकी यांच्यात दोन तीन वेळा बैठक झाली. त्यांना ही जागा ताब्यात देण्यासाठी व कोर्या कागदावर सह्या करण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला जात होता. मात्र या जमीनीच्या देखभालीसंदर्भात आजपर्यंत केलेल्या मेहनतीचा व देखभालीचा योग्य मोबदला दिल्यास आपण या कागदपत्रांवर सह्या करू असे जगताप यांनी सांगितले होते. त्यानंतर शुुक्रवारी जगताप यांनी जयेश जगताप यांना या बैठकांतील सर्व हकिकत सांगितली. तसेच या जागेचा ताबा तू भविष्यात दिला नाही तर कागदांवर सह्या करून कसा ताबा घ्यायचा आहे हे मला माहित आहे. यात माझा लौकीक आहे. तू घरी जाऊन विचार कर असे धमकावले. त्यानंतर शनिवारी सकाळी जगताप नेहमीप्रमाणे त्यांच्या रास्ता पेठेतील या जागेवर गेल्यावर तेथे विनोद भोळे व इतर सहा ते सात जण तेथे आले. त्यांच्यात तेथे बोलणे झाले. त्यामुळे ते घाबरलेल्या स्थितीत बाहेर आले. काही कामानिमित्त ते तेथून निघून गेले. त्यानंतर त्यांनी घोरपडी येथे आत्महत्या केली. त्यांच्यासोबत गेलेल्या रिक्षाचालकाजवळ त्यांनी लखोटा दिला होता. तो पाहिला त्यावेळी त्यात दिपक मानकर व सुधीर कर्नाटकी व फोटीतील व्यक्तींमुळे मी आत्महत्या करत असल्याचे त्यात लिहिले होते. असे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानंतर याबाबत लोहमार्ग पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून तो शुन्य क्रमांकाने समर्थ पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.