पुण्याच्या तत्कालीन विभागीय आयुक्तांविरोधात अवैध आदेशप्रकरणी वनगुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:08 AM2021-06-19T04:08:12+5:302021-06-19T04:08:12+5:30
बारामती : कन्हेरी परिसरातील वनपरिक्षेत्रामधील तीन एकरांवरील अतिक्रमणावर वन विभागाने धडक कारवाई केली. येथील अतिक्रमण हटविण्यात ...
बारामती : कन्हेरी परिसरातील वनपरिक्षेत्रामधील तीन एकरांवरील अतिक्रमणावर वन विभागाने धडक कारवाई केली. येथील अतिक्रमण हटविण्यात आले आहे. आरोपींनी संगनमत करून पुणे विभागीय आयुक्तांच्या अवैध आदेशाच्या आधारे वन विभागाची परवानगी न घेता राखीव वनक्षेत्रापैकी पाच एकर क्षेत्राची खरेदी-विक्रीचा व्यवहार केल्याचे या कारवाईदरम्यान उघड झाले आहे. या आरोपावरून तत्कालीन विभागीय आयुक्तांवरच वनगुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बारामती तालुक्याचे प्रभारी वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे यांनी सांगितले की, बारामती तालुक्यातील वनक्षेत्रावरील अतिक्रमण हटविले आहे. पुण्याचे उपवनसंरक्षक राहुल पाटील यांच्या सूचनेनुसार पुण्याचे सहायक वनसंरक्षक मयूर बोठे यांच्यासह वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन रघतवान यांचे फिरते पथक, पुणे वन कर्मचारी व अधिकारी यांच्या मदतीने तीन एकरांवरील अतिक्रमण हटवले आहे. या कारवाईदरम्यान दत्तात्रय निवृत्ती पाटोळे (रा. काटेवाडी, ता. बारामती) यांच्यावर वनगुन्हा दाखल करत कन्हेरी राखीव वन सर्व्हे नंबर ६४ सध्याचा गट नंबर २८९ या राखीव वनक्षेत्रावर अतिक्रमण काढले आहे.
किशोर हंसराज पाचंगे व दत्तात्रय निवृत्ती पाटोळे, भगवान देवबा क्षीरसागर यांचे अतिक्रमण काढले गेले. भगवान देवबा क्षीरसागर (रा. काटेवाडी, ता. बारामती) व मारुती विष्णू भिसे या आरोपींनी संगनमत करून पुणे विभागीय आयुक्तांच्या अवैध आदेशाच्या आधारे वन विभागाची परवानगी न घेता, कन्हेरी वनक्षेत्रातील राखीव वन सर्व्हे नंबर ४३ त्याचा बदलेला सर्व्हे नंबर ६३ व त्याचा सध्याचा गट नंबर २९३ मधील राखीव वनक्षेत्रापैकी पाच एकर क्षेत्राची खरेदी-विक्रीचा व्यवहार केला. या आरोपावरून भारतीय वन अधिनियम १९२७ व वनसंवर्धन अधिनियम १९८० च्या कायद्याचा भंग केल्याच्या कारणावरून तत्कालीन पुणे विभागीय आयुक्तांसह क्षीरसागर व भिसे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईत बारामतीचे वनपाल हेमंत मोरे, मोरगावचे वनपाल अमोल पाचपुते, करंजेचे वनपाल प्रकाश चौधरी, बारामतीच्या वनरक्षक मीनाक्षी गुरव, शिर्सुफळचे वनरक्षक अनिल माने, पिंपळीच्या वनरक्षक संध्या कांबळे यांच्यासह दौंड व इंदापूर वनपरिक्षेत्रातील ५० वन कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. विशेष शासकीय अभियोक्ता अभिजित साकुरकर यांनी कायदेशीर मार्गदर्शन केले.
कन्हेरी (ता. बारामती) परिसरातील वनपरिक्षेत्रामधील तीन एकरांवरील अतिक्रमणावर वन विभागाने धडक कारवाई केली.
१८०६२०२१-बारामती-१३
१८०६२०२१-बारामती-१५