रिसॉर्टवर दगडफेक प्रकरणी गुन्हे
By admin | Published: February 20, 2015 01:14 AM2015-02-20T01:14:30+5:302015-02-20T01:14:30+5:30
अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचारप्रकरणी कुमार रिसॉर्टवर दगडफेक करणाऱ्या २०० ते ३०० आंदोलकांवर दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोणावळा : अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचारप्रकरणी कुमार रिसॉर्टवर दगडफेक करणाऱ्या २०० ते ३०० आंदोलकांवर दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी ३४ जणांची नावे पोलिसांच्या हाती आली आहेत़
कुमार रिसॉर्टच्या टेरेसवर मंगळवारी एका सात वर्षीय चिमुरडीचा मृतदेह आढळला होता. वैद्यकीय अहवालात तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे निष्पन्न झाले होते. याच्या निषेधार्थ लोणावळ््यात बुधवारी मूक मोर्चा काढण्यात येणार होता. पण मोर्चाच्या सुरुवातीला संतप्त आंदोलकांनी कुमार रिसॉर्टवर दगडफेक केली. याप्रकरणी कुमार रिसॉर्टचे व्यवस्थापक मनोहर चोपराज बुधवानी (५९, रा़ उल्हासनगर, ठाणे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार लोणावळा शहर पोलीस ठाण्यात २०० ते ३०० जणांच्या विरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ हॉटेलची तोडफोड करत आंदोलकांनी तिजोरीतील ८५ हजार रुपये व दोन एलसीडी टीव्ही (४०,००० रुपये किमतीचे) असा १ लाख २५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला असल्याचे या फिर्यादीमध्ये म्हटले आहे़
तर, सुमारे ३ हजारांचा जनसमुदाय असतानाही काही ठराविक लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याने लोणावळ््यातील नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे़ पोलिसांनी नागरिकांवर दाखल केलेले गुन्हे तातडीने मागे घ्यावेत, अन्यथा पुन्हा लोणावळा बंद करून पोलिसांच्या विरोधात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे़
कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू
च्अल्पवयीन मुलीच्या हत्याप्रकरणी कुमार हॉटेलचे कर्मचारी, सुरक्षारक्षक, तसेच लग्न सोहळ्याकरिता बाहेरून आलेले केटरिंगचे कर्मचारी अशा सुमारे ८० जणांची चौकशी करून त्यांचा जबाब शहर पोलिसांकडून नोंदविण्यात आला आहे़ मात्र, या प्रकरणी अद्याप कोणालाही ताब्यात घेण्यात आलेले नाही़ तपासाकरिता सात पथके बनविण्यात आली असून, वेगवेगळ्या दिशेने तपास सुरू आहे.