दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 07:56 PM2018-05-18T19:56:44+5:302018-05-18T19:56:44+5:30
कात्रज घाटातील पेट्रोलपंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला भारती विद्यापीठ पोलिसांनी जेरबंद केले.
पुणे : कात्रज घाटातील पेट्रोलपंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला भारती विद्यापीठ पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्या ताब्यातून सत्तुर व कोयता हस्तगत करण्यात आला आहे. अक्षय बाजीराव इंगुळकर(वय २२), विशाल सुरेश सोनवणे (वय २२) व गणेश मारुती पारखे (वय २५, तिघे, रा.आंबेगाव) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांचे साथीदार अमित बोराटे, बापू धनवडे व बाबु असे तिघे अंधाराचा फायदा घेऊन पळाले. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना भारती विद्यापीठ पोलिसांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक शिवदास गायकवाड यांना हॉटेल हवेलीच्या अलीकडील कच्च्या रस्त्यावर पाच ते सहा व्यक्ती थांबल्या असल्याची माहिती मिळाली. या व्यक्ती भिलारेवाडी येथील पेट्रोलपंपावर दरोडा टाकणार असल्याचे पोलिसांना समजले होते. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक कमलाकर ताकवले, पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचौरे यांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक गायकवाड यांनी दोन पथके तयार केली. या पथकांनी हवेली हॉटेलकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्याकडे सापळा रचून तिघांना जेरबंद केले. तिन्ही आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर खुन, खुनाचा प्रयत्न आणि वाहनचोरीचे गुन्हे दाखल आहेत. या कारवाईत पोलीस कर्मचारी प्रदीप गुरव, कृष्णा बढे, विनोद मंडलकर, गणेश सुतार, समीर बागसिराज, बाबासाहेब नरळे, सुमित मोघे सहभागी झाले होते.