हिनादीदी, आमच्या गँगची लिडर म्हणत 'राडा'; पुण्यात पुरुषांप्रमाणे महिला गुंडांची टोळी सक्रिय

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2021 06:15 PM2021-01-23T18:15:29+5:302021-01-23T18:20:58+5:30

'तू आम्हाला ओळखत नाही का ? आमच्यासोबत हिना दीदी आहे. ती आमच्या गँगची लिडर आहे.''

A criminal gang of women like men in Pune | हिनादीदी, आमच्या गँगची लिडर म्हणत 'राडा'; पुण्यात पुरुषांप्रमाणे महिला गुंडांची टोळी सक्रिय

हिनादीदी, आमच्या गँगची लिडर म्हणत 'राडा'; पुण्यात पुरुषांप्रमाणे महिला गुंडांची टोळी सक्रिय

googlenewsNext

पुणे: शहरात पुरूषांच्या गँगप्रमाणे एका महिलेची टोळी देखील सक्रिय झाली असून, खडकी परिसरात या टोळीने दहशत पसरवली आहे. ’तू  आम्हाला ओळखत नाही का ? आमच्यासोबत हिना दीदी आहे. ती आमच्या गँगची लिडर आहे.तिच्या परवानगीशिवाय वस्तीत गाडी आणायची नाही, महादेववाडी हिना दीदीच्या मालकीची आहे. परत गाडी आणली तर खल्लास करून टाकीन अशी धमकी देत एका व्यक्तीच्या घरी जावून तलावर, कोयत्याने दरवाज्यावर मारून परिसरात सशस्त्र दहशत निर्माण केल्याचा प्रकार महादेववाडी खडकी येथील आंबेडकर पुतळ्याजवळील चौकात गुरुवारी (दि.21) घडला आहे.

याप्रकरणी खडकी पोलिसांनी रिना उर्फ हिना तायडे (वय.24,रा. महादेववाडी) हिला अटक केली असून, तिचे इतर दोन साथीदार अनुक्रमे सोन्या गोपनारायण आणि लोहार यांच्यावर आर्म अँक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अमित प्रकाश काची (वय.36) यांनी फिर्याद दिली आहे. महिलेकडून टोळी चालविली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी काची हे खडकी परिसरातील एका कपड्याच्या दुकानात काम करतात. गुरुवारी सायंकाळी साडे सातच्या सुमारास ते पत्नी आणि मुलासह नातेवाईकाच्या लग्नाला जाण्यासाठी निघाले होते. आंबेडकर पुतळ्याजवळील चौकात गाडी आली असता, हिना व तिच्या इतर दोन साथीदारांनी त्यांना अडवले.त्यानंतर एका मुलाने त्याच्या शर्टमध्ये लपवलेला कोयता काढून तू आम्हाला ओळखत नाही का ? आमच्या सोबत हिना दिदी आहे. ती आमच्या गँगची लिडर आहे. तिच्या परवानगी शिवाय वस्तीत गाडी आणायची नाही, महादेववाडी हिना दिदीच्या मालकीची आहे. परत गाडी आणली तर खल्लास करून टाकील अशी धमकी त्याने दिली.त्यावेळी घाबरून जात काची यांनी गोपनारायण याला  ढकलून दिले. त्यानंतर हिना व तिच्या साथीदारांनी रात्री आठ च्या सुमारास काची राहत असलेल्या परिसरात  राडा घातला. आवाज आल्याने काची यांच्या घरातील लोकांनी बाहेर येऊन पाहिले. ’तुमचा मुलगा कुठं आहे? असे विचारून आज त्याला जिवंत सोडणार नाही असा दम दिला. तेव्हा त्यांनी घाबरून मुलगा घरात नसल्याचे सांगितले. यानंतर तिघांनी फिर्यादी यांच्या घराच्या दरवाज्यावर तलावर,कोयत्याने मारले.  तसेच परत जाताना परिसरातील लोकांना आमचे ऐकत नसाल तर एकेकाला खल्लास करू अशी धमकी देत हातातील शस्त्रे हवेत फिरत दहशत निर्माण केली. घाबरलेल्या लोकांनी घराच्या-खिडक्या व दरवाजे बंद केले. दरम्यान, झालेल्या प्रकाराची माहिती फिर्यादी यांच्या घरच्यांनी त्यांना फोनद्वारे दिली. त्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिंदे करत आहेत. 
-----------------------------------

Web Title: A criminal gang of women like men in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.