विमानाची तिकीटे घेऊन दीड कोटींची फसवणूक करणाऱ्या इग्लंडमधील कंपनीविरोधात गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2018 04:09 PM2018-12-16T16:09:38+5:302018-12-16T16:12:25+5:30
पुण्यातील एजन्सीकडून विमानाची तिकीटे घेऊन त्याचे पैसे न देता १ कोटी ४३ लाख ५३ हजार फसवणूक केल्याप्रकरणी इग्लंडच्या ए शुलमन आय एन सी लिमिटेड या कंपनीच्या प्रमुखासह भारतातील कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे : पुण्यातील एजन्सीकडून विमानाची तिकीटे घेऊन त्याचे पैसे न देता १ कोटी ४३ लाख ५३ हजार फसवणूक केल्याप्रकरणी इग्लंडच्या ए शुलमन आय एन सी लिमिटेड या कंपनीच्या प्रमुखासह भारतातील कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी निखिल ठाकुरदास (वय ४२, रा़ कल्याणीनगर) यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, कोरेगाव पार्क येथील गेरा गार्डनमध्ये ओडिसी टुर्स अँड ट्रव्हल्स या कंपनीचे कार्यालय असून कंपनीकडून विमान तिकीट विक्रीचा व्यवसाय केला जातो़. निखिल ठाकुरदास हे या कंपनीत मुख्य व्यवस्थापक म्हणून काम करतात. त्यांची एजन्सी भारतातील व परदेशातील वैयक्तिक प्रवास व कॉर्पोरेट कंपन्या यांच्यासाठी विमान तिकीटे, हॉटेल व टुरिझम ही सेवा पुरविते. ए शुलमन प्लास्टिक इंडिया या बडोदा येथील कंपनी ओडिसा टुर्सचे ८ वर्षांपासून ग्राहक आहेत. त्यांची मुख्य कंपनी यु के शुलमन आय एन सी लि़ या नावाने इंग्लडमध्ये आहे. या कंपनीचे उत्पादन व्यवस्थापक जॉन स्टील हे असून भारतातील कंपनीचे मनुष्यबळ विकास अधिकारी रणदीप रणदेव, व्यवस्थापक निराली मोरे, महाव्यवस्थापक सुबेंद्रु रॉय हे आहेत. या कंपनीचे उत्पादन व्यवस्थापक जॉन स्टील व इतर लोकांनी २७ ऑगस्ट ते २ सप्टेंबर २०१५ या दरम्यान ओडिसी टुर्सकडून ९८ आंतरराष्ट्रीय विमान प्रवासाची तिकीटांची खरेदी करुन त्या तिकीटांचे पैसे न देता या तिकीटांचा वापर केला़ ठाकुरदास यांनी कंपनीकडे वेळोवेळी पैशांची मागणी केली.
२०१५ मध्ये कोरेगाव पार्कपोलिसांकडे फसवणूक झाल्याचा अर्जही दिला होता़ दरम्यान, पैसे देण्याबाबत त्यांच्यात सातत्याने ई मेल व प्रत्यक्ष बोलणी सुरु होती. त्यामुळे जर गुन्हा दाखल केला तर पैसे मिळायला अडचण होईल, म्हणून त्यांनी गुन्हा दाखल केला नव्हता. आता ती कंपनी ठाकुरदास यांना फक्त ५ हजार डॉलर घ्या व हे प्रकरण मिटवा असे म्हणू लागली़. त्यामुळे ओडिसी टुर्सला मोठे नुकसान होणार असल्याने कंपनीच्या अधिकाऱ्यांनी संगनमत करुन फसवणूक करण्याच्या इराद्याने ही तिकीट खरेदी करुन फसवणूक केल्याबद्दल फिर्याद दिली असून कोरेगाव पार्क पोलिसांनी जॉन स्टील व इतरांवर गुन्हा दाखल केला आहे.