कोरोनासेवक बनून पोलिसांनी केले खंडणीखोराला जेरबंद; डॉक्टर महिलेकडे मागितली होती ५ लाख
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2021 08:50 PM2021-01-13T20:50:01+5:302021-01-13T21:11:54+5:30
तुमच्या पतीने तुमची व तुमच्या मुलाच्या हत्येची ५ लाखाला मला सुपारी दिली आहे.
पुणे : सय्यदनगर येथील एका बांधकाम सुरु असलेल्या साईटवर काही जण कोरोना सेवक असल्याचे सांगून कामगारांची माहिती घेऊन लागले. एकेका कामगाराला बोलावून त्यांची माहिती टिपून घेतली जात होती. प्रत्येकाचा मोबाईल नंबर घेतला जात होता. त्यानंतर तो समोर आला. त्याने मोबाईल नंबर सांगितल्यावर तो टिपून घेणाऱ्यांनी इशारा केला. दुसऱ्या त्याला तुझ्या अंगात टेम्परेचर दिसते आहे, तु जरा बाजूला उभा रहा म्हणून त्याला एका बाजूला घेऊन पकडले व त्याला पोलिसांनी आपले खरे रुप दाखवून पोलीस ठाण्यात आणले. अतिशय चलाखीने पोलिसांनी वेशांतर करुन खंडणीखोरास पकडले.
राकेश नरेश पाटील (रा. सय्यदनगर, मुळ छत्तीसगड) असे या खंडणीखोराचे नाव आहे. त्याने एका महिला डॉक्टरला जीवे मारण्याची धमकी देऊन ५ लाख रुपयांची खंडणी मागितली होती.
तुमच्या पतीने तुमची व तुमच्या मुलाच्या हत्येची ५ लाखाला मला सुपारी दिली आहे. मात्र मुलांच्या हत्येची सुपारी मी घेत नाही. मुलाला वाचवायचे असेल तर मला ५ लाख रुपये द्यावे लागतील असे म्हणत खूनाच्या धमकीने खंडणी मागीतल्याचा प्रकार समोर आला. मार्केटयार्ड पोलिसांनी याप्रकरणी खंडणीचा गुन्हा दाखल करुन २४ तासाच्या आत तपास करून आरोपीला पकडले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला ह्या व्यवसायाने डॉक्टर असून, त्यांचे बिबवेवाडी कोंढवा परिसरात क्लिनिक आहे. सोमवारी सकाळी डॉक्टर महिलेच्या मोबाईलवर एका अज्ञात व्यक्तीने फोन करून हिंदी भाषेत बोलत मै कुरेशी बात कर रहा हू अभी मेरी बात ध्यान से सुनो तुम्हारे पतीने तुम्हीरी और तुम्हारे बच्चे की ५ लाख रुपये मे मर्डर करणे की सुपारी दि है..मै बच्चों की सुपारी नही लेता, तुम्हारे बच्चों को बचाना है तो ५ लाख रुपये दो, वैसे तो मुश्कील है, पर ये ही एक रास्ता बाकी है, असे बोलुन फिर्यादींच्या मुलाला जीवे ठार मारण्याची धमकी देत ५ लाखाच्या खंडणीची मागणी केली होती. दरम्यान, डॉक्टर महिलेने पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने तांत्रिक विश्लेेषनाद्वारे तपास करत असताना, वरिष्ठ पोलिस निरीक्षक दुर्योधन पवार यांना बातमी मिळाली होती की, फोनद्वारे खंडणीची मागणी करणारा संशयित व्यक्ती सय्यदनगर परिसरात सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी काम करतो आहे. त्यानुसार पोलिसांनी वेशांतर करून राकेश पाटील याला ताब्यात घेतले. त्याच्या मोबाईलची तपासणी केली असता, त्याने डॉक्टर महिलेला कॉल केल्याचे समोर आले आले.
ही कामगिरी वरिष्ठ पोलिस निरीक्षक दुर्योधन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संतोष शिंदे कर्मचारी अनिस शेख, स्वप्नील कदम, घुले यांच्या पथकाने केली.