पेपरफुटीप्रकरणी फौजदारीची शिफारस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2018 02:24 AM2018-11-03T02:24:35+5:302018-11-03T02:25:01+5:30
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बीएस्सी कॉम्प्युटर सायन्सचे तृतीय वर्षाचे पेपर सोशल मीडियावरून व्हायरल होऊन फुटल्याप्रकरणी दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची शिफारस चौकशी समितीकडून करण्यात आली आहे.
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बीएस्सी कॉम्प्युटर सायन्सचे तृतीय वर्षाचे पेपर सोशल मीडियावरून व्हायरल होऊन फुटल्याप्रकरणी दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची शिफारस चौकशी समितीकडून करण्यात आली आहे. त्याचबरोबर याप्रकरणी नाशिक जिल्ह्यातील चांदोरी येथील के. के. वाघ कला, वाणिज्य, विज्ञान आणि कॉम्प्युटर सायन्सचे परीक्षा केंद्र रद्द करण्याचीही शिफारस समितीने केली आहे.
बीएस्सी (कॉम्प्युटर सायन्स) शाखेचे पेपर परीक्षा सुरू होण्याच्या काही वेळापूर्वी फुटल्याच्या तक्रारी परीक्षा विभागाकडे करण्यात आल्या होत्या. मनविसेचे शहराध्यक्ष कल्पेश यादव पेपर फुटल्याचे पुरावेच परीक्षा विभागाकडे सादर केले होते. त्यानंतर डॉ. दिनेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नेमण्यात आली होती. समितीने केलेल्या शिफारशीनुसार विद्यापीठाने परीक्षा केंद्र रद्द करण्याची कारवाई करायची आहे तर दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही महाविद्यालय प्रशासनाने पार पाडावयाची आहे.
समितीकडे सादर करण्यात आलेल्या पुराव्यांच्या आधारे याची चौकशी करण्यात आली. व्हॉट्सअॅपवरून व्हायरल झालेल्या पेपरवरील कोड नंबरची तपासणी केली असता तो चांदोरी येथील के. के. वाघ कला, वाणिज्य, विज्ञान आणि कॉम्प्युटर सायन्स कॉलेजमधून फुटल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे या महाविद्यालयातील परीक्षा केंद्र रद्द करण्याची शिफारस समितीकडून करण्यात आली आहे. त्याचबरोबर या प्रकरणात सहभागी असलेल्या दोषींवर फौजदारी कारवाई करण्याचीही शिफारस समितीने केली आहे.