मांजरीतील सराईत गुन्हेगाराला 'एमपीडीए' कायद्याखाली स्थानबद्ध
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2021 02:52 PM2021-10-14T14:52:58+5:302021-10-14T14:54:35+5:30
पुणे : मांजरी येथील सराईत गुन्हेगारावर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी एमपीडीए कायद्याखाली कारवाई करुन त्याला स्थानबद्ध करण्याचे आदेश ...
पुणे : मांजरी येथील सराईत गुन्हेगारावर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी एमपीडीए कायद्याखाली कारवाई करुन त्याला स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले आहे. पुणे पोलीस आयुक्तालयात आलेल्या लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत पहिलीच अशी कारवाई आहे. अभिजित महादेव कांबळे (वय २४, रा. घरकुल, मांजराईनगर, मांजरी) असे या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.
अभिजित कांबळे याने त्याच्या साथीदारांसह लोणीकंद व हडपसर परिसरात कोयता, चाकूसारखी हत्यारे घेऊन फिरत असताना खूनाचा प्रयत्न, जबरी चोरी, जबरी चोरीसह दुखापत, दंगा, बेकायदेशीर हत्यार बाळगणे अशासारखे गंभीर गुन्हे केले आहेत. मागील ५ वर्षात त्याच्याविरुद्ध ५ गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे परिसरातील नागरिक उघडपणे तक्रार देण्यास धजावत नाही.
तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर व वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांनी एमपीडीए कायद्यान्वये कांबळे याला स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव पाठविला होता. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी या प्रस्तावाची पडताळणी करुन कांबळे याला एक वर्ष स्थानबद्ध करण्याचा आदेश दिला आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी गेल्या वर्षभरात ४३ गुन्हेगारांना स्थानबद्ध केले आहे.