दौंडला पोलीस भरतीत फसवणुक दोन युवकांवर गुन्हा
By admin | Published: June 14, 2014 02:11 AM2014-06-14T02:11:21+5:302014-06-14T02:11:21+5:30
राज्य राखीव पोलीस बलाच्या भरतीदरम्यान पोलीस बलाची फसवणूक केल्याप्रकरणी दोन युवकांवर गुन्हा दाखल केला
दौंड : येथे राज्य राखीव पोलीस बलाच्या भरतीदरम्यान पोलीस बलाची फसवणूक केल्याप्रकरणी दोन युवकांवर गुन्हा दाखल केला असल्याची माहिती ठाणे अंमलदार रामचंद्र भिलारे यांनी दिली. अनमोल घोडके, अमोल दरेकर (दोघे रा. दौंड) यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या भरतीसाठी अनमोल घोडके हा गेला होता. भरतीअंतर्गत एसआरपी कॅम्प ते लिंगाळी हा पाच किलोमीटरचा परिसर युवकांना धावण्यासाठी होता. भरतीतील युवक धावत असताना अचानक मागून अमोल दरेकर याने चारचाकी गाडी आणली. धावत असलेला युवक अनमोल घोडके हा चारचाकी गाडीत बसला. सर्वांत प्रथम मी आलो, असे दाखविण्याचा त्याने प्रयत्न केला. अनमोल याला चारचाकी गाडीत बसताना युवकांबरोबर असलेले सशस्त्र पोलीस हवालदार विजय मुळे यांनी पाहिले. दरम्यान, हा सर्व फसवणुकीचा प्रकार मुळे यांनी एसआरपीच्या वरिष्ठांना कळविला. त्यानुसार अनमोल घोडके याने शासनाची फसवणूक केली, तर अमोल दरेकर याने अनमोलला सहकार्य केल्यामुळे या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.