हैदराबाद पोलिसांच्या तावडीतून गुन्हेगार पसार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:15 AM2021-08-22T04:15:09+5:302021-08-22T04:15:09+5:30
पुणे : तेलंगणा येथील एका मुलीच्या अपहरण प्रकरणातील आरोपीला पकडून घेऊन जात असताना पोलिसांची नजर चुकवून आरोपी पसार झाला. ...
पुणे : तेलंगणा येथील एका मुलीच्या अपहरण प्रकरणातील आरोपीला पकडून घेऊन जात असताना पोलिसांची नजर चुकवून आरोपी पसार झाला. ही घटना खराडी मुंढवा बायपास रोडवरील हॉटेल पंचमसमोर शुक्रवारी पावणे बारा वाजता घडली.
जुबेर हाफिज शेख (वय २०, रा. मरकुंडा, ता. जि. बिदर, कर्नाटक) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक बी कृष्णय्या रामलू बी यांनी चंदनगर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. जुबेर शेख याच्याविरुद्ध तेलंगणामधील सरूरनगर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल आहे. हा आरोपी पुण्यात रहात असल्याची माहिती मिळाल्यावर पीडित मुलीच्या नातेवाइकांना घेऊन बी कृष्णय्या व दोन पोलीस कर्मचारी पुण्यात आले. त्यांनी जुबेर शेख याला ताब्यात घेऊन खासगी गाडीने घेऊन जात होते. पंचम हॉटेलसमोर गाडी उभी असताना मागील उघडे असलेल्या दाराजवळ त्याची बहीण शबनम ऊर्फ पूनम गालफाडे हिच्याबरोबर बोलत होता. या वेळी पोलिसांची नजर चुकवून तो पळून गेला. परिसरात त्याचा शोध घेतल्यानंतरही तो न मिळाल्याने चंदननगर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली.
.......
पकड वाॅरंट बजावल्यानंतर आरोपी पळाला
कौटुंबिक न्यायालयाचे पकड वॉरंट बजावून ताब्यात घेत असताना आरोपी पळून गेला. ही घटना केळेवाडी येथे शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजता घडली.
याप्रकरणी साईदास सावळाराम थोरवे (रा. केळेवाडी, पौड रोड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जयेश मलकापूरकर (वय ५५, रा. चिंचवड) यांनी कोथरूड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. थोरवे हे कौटुंबिक न्यायालयात बेलिफ म्हणून नोकरीला आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार साक्षीदार जयप्रकाश साळुंके यांच्यासमवेत पकड वॉरंटची बजावणी करण्यासाठी थोरवे यांच्या घरी गेले होते. यावेळी त्यांना अटकेचे कारण सांगून तुम्हाला अटक केली, असे मलकापूरकर यांनी सांगितले. असे असताना त्यांना न जुमानता थोरवे पळून गेला.