गुन्हेगारांचा तलवारीसह कोंढव्यात धुडगूस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:08 AM2021-06-10T04:08:18+5:302021-06-10T04:08:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोंढव्यात गुन्हेगारांच्या टोळीने रस्त्यात तलवारी नाचवत दुकानदारांना जबरदस्तीने दुकाने बंद करायला लावून एकावर वार ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोंढव्यात गुन्हेगारांच्या टोळीने रस्त्यात तलवारी नाचवत दुकानदारांना जबरदस्तीने दुकाने बंद करायला लावून एकावर वार केले. तसेच, हॉस्पिटलची काच फोडून नुकसान केले. या घटनेनंतर मंगळवारी दुपारी पुन्हा अशरफनगर भागात गुंड दहशत पसरवित असताना नागरिकांनीच पुढे होऊन गुंडांना पकडण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याकडून तलवार हिसकावून घेऊन ती पोलिसांच्या ताब्यात दिली.
कोंढवा पोलिसांनी शहबाज ऊर्फ लंबू खान (वय २४, रा. अशरफनगर), अरबज खान (वय ३०, रा. अशरफनगर) व त्यांच्या इतर ५ साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी डॉ. ओबेदउल्ला अब्दुलरहिम खान (वय ३३, रा. कोंढवा) यांनी फिर्याद दिली आहे. डॉ. खान यांचे अशरफनगर येथे शिफा पॉली क्लिनिक नावाचे हॉस्पिटल आहे. सोमवारी रात्री साडेआठ वाजता दोघे जण अचानकपणे त्यांच्या हॉस्पिटलमध्ये आले. तेथे बसलेल्या २ महिला रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना हॉस्पिटलचे शटर लावून घ्या, अशी दमबाजी केली. त्यांच्या ओरडण्याच्या आवाजाने खान बाहेर आले. त्यांनाही ते शटर लावून घेण्याबाबत सांगू लागले. परंतु, त्यांनी विरोध केल्यावर हॉस्पिटलची काच तलवारीने फोडून ते निघून गेले. त्यानंतर लफबेग मेडिकल स्टोअर्सवर जाऊन त्यांनी अशाप्रकारे दमबाजी केली. तसेच, मेडिकल स्टोअर्सची तोडफोड करण्याची धमकी दिली.
टोळक्याने हवेत तलवारी फिरवत शिवीगाळ, आरडाओरडा करून या भागातील दुकाने बंद करण्यास सांगितले. अशरफनगर गल्ली नं. १२ मध्ये जाऊन तेथे उभ्या असणाऱ्र्या ४ ते ५ जणांवर कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. याठिकाणी भाजीविक्रेते सलिम शेख यांची भाजीची गाडी उलटी केली. चहाविक्रेत्या महिलेला दुकान बंद करण्यास सांगितले. गुफरान अन्सारी यांचे किराणा दुकान बंद करून त्याला कोयत्याने मारहाण केली. या हल्ल्यात तो जखमी झाला. इरफान लियाकत सय्यद याच्या डाव्या हाताला टोळीतील लॅब याने चावा घेतला.
हप्त्यांसाठी धमकावले
तोडफोड करणाऱ्र्यांच्या दहशतीमुळे खान यांनी सोमवारी रात्री तक्रार दिली नाही. मंगळवारी दुपारी साडेबारा वाजता खान तक्रार देण्यासाठी कोंढवा पोलीस ठाण्यात जात असताना हे दोन्ही गुंड त्यांच्या हॉस्पिटलच्या परिसरात तलवारी घेऊन सर्व दुकानदारांना हप्ते द्या नाहीतर दुकाने बंद करू, अशी धमकी देत होते. त्या वेळी लोकांनी त्यांना पकडून त्यांच्याकडील तलवारी हिसकावून घेतली.