पावसाअभावी पुन्हा बटाटा लागवडीचे संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:08 AM2021-07-09T04:08:23+5:302021-07-09T04:08:23+5:30
मंचर : जूनच्या सुरुवातीला सुरू झालेल्या मॉन्सूनने ब्रेक घेतला आहे. जुलै महिन्यातील पहिला आठवडा संपत आला तरी पाऊस पडण्याची ...
मंचर : जूनच्या सुरुवातीला सुरू झालेल्या मॉन्सूनने ब्रेक घेतला आहे. जुलै महिन्यातील पहिला आठवडा संपत आला तरी पाऊस पडण्याची चिन्हे काही दिसत नाही. पावसाअभावी पिके धोक्यात आली असून सातगाव पठारावरील बटाटा पिकाची पुन्हा एकदा लागवड करावी लागणार आहे. यामुळे शेतकऱ्यांवर दुबार लागवडीचे संकट ओढवले असून मोठा आर्थिक फटका बसला आहे. पूर्वी लागवडीसाठी केलेला संपूर्ण खर्च वाया गेल्याने शेतकरी चिंतीत झाला आहे.
आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठार भाग बटाटा पिकाचे आगार म्हणून ओळखला जातो. कुरवंडी, कोल्हारवाडी, थुगाव, भावडी, कारेगाव, पेठ, पारगावतर्फे खेड या सात गावांत दरवर्षी सुमारे दहा हजार एकर क्षेत्रावर बटाटा लागवड केली जाते. मागील वर्षी बटाटा पिकाने शेतकऱ्यांना चांगलाच फटका दिला. निसर्गाची अवकृपा तसेच कमी बाजारभाव यामुळे बहुतेक शेतकऱ्यांचे भांडवल वसूल झाले नाही. शेतकरी कर्ज काढून भांडवल उपलब्ध करत बटाटा पीक घेतो. मात्र, मागील वर्षी अनेक शेतकऱ्यांना फटका बसून भांडवल अंगावर आले. त्याचा परिणाम या वर्षीच्या बटाटा लागवडीवर झाला आहे. मागील वर्षीचा तोटा यामुळे या वर्षी बटाटा लागवड कमी झाल्याची माहिती भावडी येथील अशोक बाजारे यांनी दिली.
बटाटा पिकाला एकरी साठ हजार रुपये भांडवली खर्च येतो. अनेक शेतकऱ्यांनी धाडसाने बटाटा लागवड केली आहे. सुरुवातीला पडलेल्या पावसाच्या ओलीवर शेतकऱ्यांनी बटाटा लागवड केली. मात्र मागील पंधरा दिवसांपासून पावसाने पूर्णपणे उघडीप दिली आहे. दिवसभर कडक ऊन पडलेले असते. परिणामी बटाटा पीक धोक्यात आले आहे. लागवड झालेले बटाटा पीक वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली असून, दुबार लागवडीची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र पहिल्याच लागवडीला शेतकऱ्याकडे भांडवल नव्हते. कर्ज काढून त्यांनी भांडवल कसेबसे उभे केले. त्यामुळे दुसऱ्यांदा बटाटा लागवड करायची झाली तर भांडवल उभे कसे करायचे, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे.
येत्या आठ दिवसांत पाऊस पडला नाही तर बटाटा पीक पूर्णपणे वाया जाणार आहे. या भागातील शेती पूर्णपणे पावसावर अवलंबून आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. बटाटा पिकाचा राष्ट्रीय पीक विमा योजनेत समावेश करावा, अशी मागणी हुंडेकरी व्यावसायिक राम तोडकर, अशोकराव बाजारे यांनी केली आहे.
कमी भांडवली पिकांकडे वाढला कल
बदलत्या हवामानाचा फटका शेतकऱ्यांना सोसावा लागत असताना कोरोनाच्या संकटालाही सामोरे जावे लागले. अनेक ठिकाणी बाजारपेठा बंद असल्याने बटाट्याला अपेक्षित अशी मागणी नव्हती. भविष्यात ती वाढेल याची शाश्वती नसल्याने शेतकरी कमी भांडवल असलेल्या पिकांकडे या वर्षी वळाला आहे. सातगाव पठार भागात या वर्षी केवळ पाच हजार एकर क्षेत्रावर बटाटा लागवड झाल्याचा अंदाज आहे. त्यासाठी तीन हजार ४०० रुपये प्रतिक्विंटल या बाजारभावाने बियाणे आणले आहे. तर कमी भांडवल असणाऱ्या सोयाबीन, वाटाणा, फरशी, बीट, भुईमूग,मेथी, कोथिंबीर या पिकांचे लागवड क्षेत्र वाढल्याची माहिती कोल्हारवाडी येथील जयसिंग एरंडे यांनी दिली.
०८ मंचर
सातगाव पठार भागात बटाटा लागवड झाली असून, पावसाअभावी बटाट्याची उगवण झालेली नाही.