Video: पुण्याच्या मुळा नदीतील गंभीर प्रकार; भराव टाकून अतिक्रमण करण्याचे उद्योग सर्रासपणे सुरु
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2022 19:43 IST2022-05-12T19:41:55+5:302022-05-12T19:43:16+5:30
कारखान्यांमधील केमिकलयुक्त सांडपाणी व नागरीकीकरणामुळे मिसळणाऱ्या मैलामिश्रित सांडपाण्यामुळे नदी प्रदूषणात वाढ गंभीर समस्या बनली आहे.

Video: पुण्याच्या मुळा नदीतील गंभीर प्रकार; भराव टाकून अतिक्रमण करण्याचे उद्योग सर्रासपणे सुरु
पाषाण : बालेवाडी पिंपळे निलख परिसरात मुळा नदी पात्रात हायवा ट्रक आणि जेसीबीच्या साह्याने भराव टाकणाऱ्यांवर कडक कारवाई करणेबाबत रयत विद्यार्थी परिषदेच्या वतीने पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. विशाल वाघमारे यांनी वाकड येथे मुळा नदी पात्रात भराव टाकणाऱ्यांचे व्हिडीओ शूट करून संबंधित गंभीर प्रकार उघडकीस आणला आहे.
पिंपरी-चिंचवड व पुणे महानगरपालिका हद्दीतून मुळानदी १२.५० किलोमीटर अंतरावर वाहते. या मुळा नदी पात्रात भराव टाकुन अतिक्रमण करण्याचे उद्योग सर्रासपणे सुरु आहेत. कारखान्यांमधील केमिकलयुक्त सांडपाणी व नागरीकीकरणामुळे मिसळणाऱ्या मैलामिश्रित सांडपाण्यामुळे नदी प्रदूषणात वाढ गंभीर समस्या बनली आहे.
त्याचप्रमाणे प्रदूषणा बरोबर नदीपात्रात व पात्रालगत होणारे अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामे आणि घरे यामुळे नदीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. नदी पात्रात मोठ्या प्रमाणात राडारोडा टाकून, भराव टाकून नदीचे पात्र बुजवले जात आहे. नद्यांचे पात्र दिवसेंदिवस अरुंद होत असून पावसाळ्यात शहराला पूरस्थितीचा सामना करावा लागत आहे. राष्ट्रीय हरित लवादाने नदीपात्रालगतची झालेली अतिक्रमणे काढण्याबाबत आदेश दोन्ही महानगरपालिकांना देण्यात आला होता.
परंतु या आदेशाची अंमलबजावणी होण्याआधीच नदीपात्रालगत भराव टाकणा-यांवर कारवाई होण्याआधीच आता थेट नदीपात्रातच भराव टाकण्याचे काम जोरात सुरू आहे . अत्याधुनिक हायवा ट्रक व जेसीबीच्या सहाय्याने मुळा नदी पात्रात भराव टाकुन सपाटीकरण करण्याचे काम सुरू आहे.
पिंपरी-चिंचवड व पुणे महानगरपालिका अधिकारी या संतापजनक गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष का करत आहेत असा प्रश्न उपस्थित होत असून मुळा नदी पात्रात भराव टाकण्यामागे कोण आहे? बांधकाम व्यवसायिक आहे की राजकीय पुढारी आहे? हे समोर येणे गरजेचे आहे.नदी पात्रात भराव टाकण्यासाठी वापरलेली यंत्रसामग्री जप्त करण्यात यावी तसेच मुळा नदीपात्रातील टाकलेला भराव कोण काढणार याची जबाबदारी कोण घेणार?
तसेच संबंधित प्रकरणात या भराव टाकणाऱ्यांवर कारवाई कोण करणार? हा महत्त्वाचा मुद्दा आहे की,पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका वादातून वेळ काढून कारवाई करणार का असे अनेक महत्त्वाचे प्रश्न उपस्थित होतात.
राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या नियंत्रणाखाली पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांची एकत्र समिती स्थापन करुन नदी प्रदूषणाबाबत व नदीपात्रालगत अतिक्रमणाबाबत ॲक्शन प्लॅन तयार करण्याची तयारी सुरू होती. परंतु या ॲक्शन प्लॅन संबंधित यंत्रणांना विसर पडला आहे.
या अगोदर ही मुळा नदी प्रदूषणाबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे वेळोवेळी तक्रार केली आहे.परंतु नोटीस पाठवणे पलीकडे कोणतीही कारवाई झाली नाही. स्थानिक प्रशासकीय व्यवस्था या गंभीर प्रश्नाबाबत उदासीन असल्यामुळे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. तसेच नदी पुनर्जीवित करून पुणे महानगर पालिका व पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेला योग्य उपाय योजना करण्यात याव्यात अशी मागणी रयत विद्यार्थी परिषदेचे सूर्यकांत सरवदे यांनी केली आहे.
पुण्याच्या मुळा नदीपात्रात बेकायदा भराव सुरू #Pune#mulamuthapic.twitter.com/gSNPSaR0ZL
— Lokmat (@lokmat) May 12, 2022