सोशल मीडियावर आढळराव पाटील यांच्यावर शिवराळ भाषेत टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:17 AM2021-03-13T04:17:57+5:302021-03-13T04:17:57+5:30
मंचर : शिवसेना उपनेते, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा समाज माध्यमांवर एकेरी असभ्य शिवराळ भाषा वापरल्याप्रकरणी खासदार डॉ. ...
मंचर : शिवसेना उपनेते, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा समाज माध्यमांवर एकेरी असभ्य शिवराळ भाषा वापरल्याप्रकरणी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचे भाऊ सागर रामसिंग कोल्हे यांच्यावर मंचर पोलीस ठाण्यात अदखल पात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंचरचे माजी सरपंच दत्ता गांजाळे यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. आढळराव पाटील यांची कोल्हे यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी गांजाळे यांनी केली आहे.
दत्ता गांजाळे म्हणाले की, अमोल कोल्हे खासदार म्हणून निवडून आल्यानंतर गेली दोन वर्षे त्यांच्याकडून कुठलेच काम होत नसल्याने जनतेमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. आढळराव पाटील यांच्यामुळे गावागावात मिळणारा हक्काचा खासदार निधी बंद पडला. पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पाला राज्याची मंजुरी मिळाल्याने खासदार कोल्हे यांनी श्रेयासाठी केलेल्या प्रयत्नांना सोशल मीडियावर लोकांनी जबरदस्त ट्रोल करत या कामाचे श्रेय आढळराव-पाटील यांना दिल्याने कोल्हे यांचे भाऊ सागर रामसिंग कोल्हे यांनी अतिशय हीन पातळीवर जाऊन घाणेरड्या भाषेत माजी खासदार आढळराव पाटील यांची बदनामी सुरू केली आहे. त्यामुळे सागर कोल्हे यांच्याविरोधात मंचर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची जाहीर माफी मागावी. अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन केले जाईल, असा इशारा दत्ता गांजाळे यांनी दिला. दरम्यान सागर कोल्हे यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. सायबर सेलकडे हे प्रकरण सोपवले जाणार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अर्जुन शिंदे करत आहेत.