कलचाचणी : आभास की वास्तव?
By admin | Published: April 19, 2017 04:07 AM2017-04-19T04:07:30+5:302017-04-19T04:07:30+5:30
कलचाचणीच्या माध्यमातून योग्य मार्गदर्शन मिळाले नाही, तर विद्यार्थ्याचे करिअर धुळीस मिळू शकते. त्यामुळे कलचाचणीच्या नावावर दुकाने थाटून बसणाऱ्यांपासून सावध राहा
पुणे : कलचाचणीच्या माध्यमातून योग्य मार्गदर्शन मिळाले नाही, तर विद्यार्थ्याचे करिअर धुळीस मिळू शकते. त्यामुळे कलचाचणीच्या नावावर दुकाने थाटून बसणाऱ्यांपासून सावध राहा. तसेच, त्यांच्याकडून दाखविल्या जाणाऱ्या दिशादर्शनावर पूर्णत: विसंबून न राहता शास्त्रशुद्ध पद्धतीने विद्यार्थ्यांच्या बुद्ध्यंकाची, आवडीनिवडीची तपासणी केल्यानंतर मार्गदर्शनानुसार करिअरची निवड करा, असा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे.
दहावी-बारावीनंतर कोणत्या अभ्यासक्रमाची निवड करावी, याबाबत विद्यार्थी व पालकांमध्ये चिंतेचे वातावरण असते. काही पालक आपल्या कुटुंबातील उच्च शिक्षितांचा सल्ला घेतात, तर काही विद्यार्थी आपल्या मित्रमैत्रिणींनी निवडलेल्या अभ्यासक्रमाचीच निवड करतात. परंतु, काही वर्षांपासून पालकांमध्ये जागृती झाली आहे. करिअर मार्गदर्शकांकडून सल्ला घेऊन विद्यार्थ्यांचा कल तपासून अभ्यासक्रम निवडीबाबत निर्णय घेतला जात आहे. राज्य शासनातर्फे दहावीच्या विद्यार्थ्यांची कलचाचणी घेऊन त्यांना मार्गदर्शन केले जाते.
तसेच, काही खासगी संस्थांकडून अवाच्या सवा शुल्क आकारून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जात आहे. परंतु, बुद्ध्यंक, आवडीनिवडी, गणित, भाषा विषयातील ज्ञान आदींच्या आधारे शास्त्रशुद्ध पद्धतीने केल्या जाणाऱ्या कलचाचणीनुसार विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रम व करिअर निवडणे उचित ठरणार आहे.
राज्य शासनाच्या विद्या प्राधिकरणांतर्गत पुण्यात विभागीय व्यवस्थापन मार्गदर्शन व निवड संस्थेच्या माध्यमातून मानसशास्त्रीय कसोटीद्वारे मार्गदर्शन व समुपदेशन केले जाते. प्रत्येक सोमवारी सुमारे ५० ते ६५ विद्यार्थ्यांच्या विविध चाचण्या घेऊन त्यांचा बुद्ध्यंक तपासला जातो. तसेच, शासनाच्या कोणत्या संस्थेमधील कोणता अभ्यासक्रम निवडता येईल, याबाबत तज्ज्ञांकडून सल्ला दिला जातो.
एखाद्या विद्यार्थ्याला वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्याची
आवड असते; परंतु त्याची क्षमता नसते. त्यामुळे त्याला डॉक्टर
होता आले नाही, तर वैद्यकीय
क्षेत्रात तो कोणते करिअर करू
शकेल, या संदर्भातील योग्य
माहिती विद्यार्थ्यांना मिळू शकते. त्यामुळे कलचाचणी करून घेणे
योग्य आहे.
(प्रतिनिधी)