नारायण राणेंवर आक्षेपार्ह शब्दात टीका; आमदार भास्कर जाधव यांना अटकपूर्व जामीन मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2022 08:44 PM2022-11-22T20:44:57+5:302022-11-22T20:45:06+5:30

भास्कर जाधव यांना पंधरा हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर

criticized Narayan Rane in offensive terms MLA Bhaskar Jadhav granted pre arrest bail | नारायण राणेंवर आक्षेपार्ह शब्दात टीका; आमदार भास्कर जाधव यांना अटकपूर्व जामीन मंजूर

नारायण राणेंवर आक्षेपार्ह शब्दात टीका; आमदार भास्कर जाधव यांना अटकपूर्व जामीन मंजूर

googlenewsNext

पुणे : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह दोन्ही पुत्र माजी खासदार नीलेश राणे व आमदार नितेश राणे यांच्यावर आक्षेपार्ह शब्दांत टीका करून सामाजिक भावना दुखावल्याप्रकरणी शिवसेनेचे (ठाकरे गट) आमदार भास्कर जाधव यांना न्यायालयाने मंगळवारी अटकपूर्व जामीन मंजूर केला. सत्र न्यायाधीश एस. एस. गुल्हाने यांनी हा आदेश दिला. त्यांच्यावर पुण्यातील डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

भास्कर जाधव यांना पंधरा हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला. या प्रकरणात दोषारोपपत्र दाखल होईपर्यंत दर गुरुवारी सकाळी अकरा ते दुपारी पाच या वेळेत किवा तपास अधिकारी बोलावेल तेव्हा डेक्कन पोलिस ठाण्यात हजेरी लावावी,तपास कामात सहकार्य करावे,पुराव्यात छेडछाड करू नये,अशा अटीही न्यायालयाने घातल्या आहेत.

शिवसेनेचे (ठाकरे गट) कुडाळ येथील आमदार वैभव नाईक यांची बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चौकशी केल्याच्या निषेधार्थ १८ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्गात निषेध मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात भास्कर जाधव यांनी नारायण राणे व त्यांच्या दोन्ही मुलांवर शेलक्या शब्दांत टीका केली होती. त्यावर पुण्यातील भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते योगेश शिंगटे यांनी जाधव यांच्याविरोधात पुण्यातील डेक्कन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.

या प्रकरणात पुणे न्यायालयाने भास्कर जाधव यांना २४ ऑक्टोबरला तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. भास्कर जाधव यांनी कायमस्वरुपी अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी ॲड. विजयसिंह ठोंबरे यांच्यामार्फत सत्र न्यायालयात अर्ज केला होता. जाधव यांनी समाजात फूट पाडणारे किवा धार्मिक तेढ निर्माण करणारे वक्तव्य केलेले नसल्याचा युक्तिवाद बचाव पक्षातर्फे करण्यात आला. न्यायालयाने बचाव पक्षाचा युक्तिवाद मान्य करत भास्कर जाधव यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला. बचाव पक्षाला दिग्विजयसिंह ठोंबरे व विष्णू होगे यांनी साहाय्य केले.

Web Title: criticized Narayan Rane in offensive terms MLA Bhaskar Jadhav granted pre arrest bail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.