आदर्शांची चिकित्सा व्हायला हवी : डॉ. अरुणा ढेरे
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2019 08:51 PM2019-03-31T20:51:15+5:302019-03-31T20:52:12+5:30
रामायण, महाभारत या ग्रंथांमधील विचार आत्मसात करून नागरिकांनी समृद्ध होत आनंद निर्माण केला तर एकूणच समाज जीवन अधिक आनंददायी आणि सुदृढ होऊ शकेल...
पुणे : ‘प्रश्नांची सोडवणूक कशी करावी, हे सांगणारे शिक्षक महत्त्वाची भूमिका पार पाडतात. रामायण, महाभारत या ग्रंथांमधील विचार आत्मसात करून नागरिकांनी समृद्ध होत आनंद निर्माण केला तर एकूणच समाज जीवन अधिक आनंददायी आणि सुदृढ होऊ शकेल. आदर्श हे कालानुरूप बदलत असतात. त्याची चिकित्सा ही जरूर केली गेली पाहिजे. परंपरेला प्रश्न विचारण्यासाठी अंगाी धाडस असावे लागते, असे मत साहित्य संमेलनाध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे यांनी व्यक्त केले.
ज्येष्ठ लेखिका व संशोधिका डॉ. अपर्णा जोशी यांच्या ‘राष्ट्रीय मूल्य शिक्षणामध्ये महाभारताचे योगदान’ या पुस्तकाच्या प्रकाशनावेळी त्या बोलत होत्या. यावेळी आमदार मेधा कुलकर्णी, ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे, नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे व प्रकाशक जयंत कुलकर्णी उपस्थित होते. भांडारकर संस्थेच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
डॉ. ढेरे म्हणाल्या, ‘अर्थ म्हणजे केवळ पैसा नव्हे तर जीवनरुपी अर्थ शिकवण्याची गरज आहे. नैतिकता आणि धर्माचा मूळ अर्थ हे सारे आम्ही गमावले आहे. कर्तव्य म्हणजे धर्म असेल तर या धर्माचे आम्ही पालन करतो का, याचा विचार झाला पाहिजे. पाठ्यपुस्तकात आहे त्यापेक्षा मोठा अवकाश विद्यार्थ्यांसमोर ठेवण्याची जबाबदारी शिक्षकांवर आली आहे. त्यातून एखादा विद्याार्थी टिपकागदाप्रमाणे टिपेल. अभ्यास करून नवी मांडणी करेल आणि संशोधन विषय पुढे घेऊन जाईल. आदर्श हे स्वयंभू आणि सार्वकालिक नसते. तर, कालानुरूप बदलत असते. दरवेळी त्या आदर्शांना कालानुरूप तपासून घ्यावे लागते. वाचन, संगीत, चित्र या अदृश्य आनंदातून माणूस म्हणून घडण्याची प्रक्रिया घडते.’
डॉ. जोशी म्हणाल्या, ‘अव्यभिचारी निष्ठा म्हणजे राष्ट्रभक्ती आहे. रामायण आणि महाभारत हे दोन्ही ग्रंथ आपल्या देशाचे अमूल्य ठेवा आहेत. महाभारतातल्या अनेक कथा या मूल्यशिक्षण देणा-या आहेत. राष्ट्रीय एकात्मता, एकजूट शिकवणारा महान ग्रंथ असे महाभारताबद्दल निश्चित म्हणता येईल. धर्म म्हणजे कर्तव्य हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. राष्ट्राच्या एकात्मते संदर्भात महाभारतातील अनेक कथांचा शिक्षक, विद्यार्थी आणि सर्वच नागरिकांनी जरूर बोध घेतला पाहिजे. धर्म म्हणजे कर्तव्य हे आपण लक्षात घेतले पाहिजे. सत्य आणि अहिंसा याचा विचार आपल्याला महाभारतातून मिळतो.’
कुलकर्णी म्हणाल्या, ‘रामायण रामाची कथा आहे. त्याप्रमाणे महाभारत ही कृष्णाची, अजुर्नाची नाही तर अवघ्या भारताची कथा आहे. महाभारत आपल्याला सत्य, सौहार्द, समन्वय आणि धाडस या चार गोष्टी शिकवते.’