समीक्षकांना माझी कविता समजलीच नाही
By admin | Published: January 25, 2017 02:24 AM2017-01-25T02:24:51+5:302017-01-25T02:24:51+5:30
गेय कवींनीच मराठीत स्वत:च्या नव्या वाटा निर्माण केल्या आहेत; पण समीक्षकांना माझी कविता समजली नाही. माझ्या कवितेची समीक्षा झाली असती
पुणे : गेय कवींनीच मराठीत स्वत:च्या नव्या वाटा निर्माण केल्या आहेत; पण समीक्षकांना माझी कविता समजली नाही. माझ्या कवितेची समीक्षा झाली असती, तर एक कवी म्हणून नक्कीच मोठा झालो असतो. मला मोठे होऊ द्यायचे नव्हते, म्हणून माझ्या कवितांची समीक्षा झाली नाही, अशा शब्दातं प्रसिद्ध कवी प्रकाश घोडके यांनी समीक्षकांवर टीका केली.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ‘एक कवयित्री, एक कवी’ कार्यक्रमात अॅड. प्रमोद आडकर आणि ज्येष्ठ कवी उद्धव कानडे यांनी घोडके आणि संजीवनी बोकील या दोन्ही कवींची प्रकट मुलाखत घेतली, त्या वेळी ते बोलत होते.
संजीवनी बोकील म्हणाल्या, ‘‘काव्य जन्माला येताना जाणिवा आणि नेणिवांची प्रगल्भता फार मोलाची असते. शुभ्र पक्ष्यांचा थवा आकाशातून विहरावा तसा प्रतिभावंत काव्यानुभवात विहरत असतो. बालवयातच कविता संवेदनांचं आकाश बनून श्वासात घर करून बसली.’’
‘मळलेल्या जुन्या वाटांवरून चालणं सोप काम असतं. त्यात नवीन असं काही नसतं; पण प्रतिभावंतांनी मनाची मशागत करणाऱ्या नव्या वाटा निर्माण केल्या पाहिजेत,’ असे घोडके आणि बोकील यांनी सांगितले.
प्रकाश पायगुडे यांनी प्रास्ताविक करून कवींचा सत्कार केला. कार्यवाह उद्धव कानडे यांनी सूत्रसंचालन केले. शिरीष चिटणीस यांनी आभार मानले.