समीक्षकांना गझलेची तंत्रशुद्ध माहिती नाही - रमण रणदिवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 12:44 AM2018-09-29T00:44:05+5:302018-09-29T00:47:24+5:30

उत्तम गझल लिहिण्यासाठी चांगला कवी असावा लागतो आणि त्याआधीही तो कवी उत्तम माणूस असणं अनिवार्य आहे. आज गझलची स्थिती अशी आहे, की चाळीस टक्के चांगल्या आणि साठ टक्के टुकार गझल लिहिल्या जात आहेत.

Critics do not know the technical accuracy of Ghazal - Raman Ranadeev | समीक्षकांना गझलेची तंत्रशुद्ध माहिती नाही - रमण रणदिवे

समीक्षकांना गझलेची तंत्रशुद्ध माहिती नाही - रमण रणदिवे

Next

उत्तम गझल लिहिण्यासाठी चांगला कवी असावा लागतो आणि त्याआधीही तो कवी उत्तम माणूस असणं अनिवार्य आहे. आज गझलची स्थिती अशी आहे, की चाळीस टक्के चांगल्या आणि साठ टक्के टुकार गझल लिहिल्या जात आहेत. या साठ टक्के गझलांवर समीक्षक काय लिहिणार? म्हणून ते दुर्लक्ष करतात. यातच समीक्षकांनादेखील तंत्रशुद्ध गझलची माहिती नाही. त्यांना गझलचे ज्ञान नाही, त्यामुळे ते गझलच्या नादी लागत नाहीत, अशा शब्दांत ज्येष्ठ गझलकार रमण रणदिवे यांनी गझलेच्या स्थितीबद्दल चिंता व्यक्त केली.

गझल हा गद्यात्मक काव्यप्रकार आहे. गद्य हे पद्यापेक्षा विलग असते, हे त्याच्या गेयता आणि लयबद्धतेमुळे. छंदोविहीन कवितेला काव्यात्मक गद्य म्हणणे अधिक सयुक्तिक ठरणारं आहे. आजची गझल ही गुणात्मक नव्हे, तर संख्यात्मक वाढलेली आहे. काही तरुण चांगल्या प्रकारातील नव्या विषयातील, भाषेतील गझल सादर करीत आहेत. ही चांगली बाब असली तरीही कलात्मक मर्मदृष्टी असलेल्या साहित्यरसिकाला मराठी आशयाची गझलता आणि विस्तृतता सहज कळते. त्याच्यासाठी जवळपास ४५ वर्षांपासून मी गझल लिहित आहे. यासाठी कै. सुरेश भट यांचे मला मार्गदर्शन लाभले.
सुरेश भट यांनी मिशन म्हणून गझलचा प्रचार व प्रसार केला. २००३ मध्ये ते गेल्यानंतर गझल हा प्रकार मराठी लोकांना आवडू लागला. त्याचा आस्वाद कसा घ्यायचा, दाद कशी द्यायची हे कळू लागले. लोकांची आकलनक्षमता आणि स्तर उंचावल्यामुळे नकळतपणे गझलकारांची जबाबदारीही वाढली. गझल म्हणजे काय, तर ती कवितांची कविता असते. कवितेतून जगणे आणि जगण्यातून कविता कधीच वेगळी काढता येत नाही. गझल ही जीवनाला भिडणारी असते. गझल लिहिण्यासाठी कवी उत्तम असावा लागतो, तरच कवितेत भाव येतो आणि गझलमध्ये वैविध्यपूर्ण रंगांची उधळण होते. काव्यात पूर्वी संस्कृतप्रचुर शब्दांचा अतिप्रमाणात वापर होत होता. नंतर मुघल राजवटीमध्ये उर्दू, हिंदी शब्दांचा पगडा भाषेवर प्रामुख्याने दिसून आला. उर्दू गझलला तीनशे ते चारशे वर्षांची परंपरा आहे. उर्दू काव्यामध्ये गझल काव्यप्रकार अतिशय समृद्ध आहे. कारण त्यांचे व्याकरणाचे नियम हे उच्चारावरून ठरतात. मराठी गझलकारांनी पण हा प्रकार सुरू केला. उर्दूसारखा ‘काफिया’ ते वापरत आहेत, त्यामुळे ती कारागिरी ठरत आहे. तरीही मराठी उर्दूइतकी समृद्ध होणार नाही, तर कारण तिचे आयुष्य हे अवघे पन्नास वर्षांचेच आहे. माधव ज्युलियन यांच्यापासून सुरू झालेली गझल सुरेश भट यांनी उर्दूच्या तोलामोलाची लिहिली, ती लोकांना भावली. सुरेश भट यांची कविता आमची ‘रोल मॉडेल’ ठरली. माधव ज्युलियन यांची गझल फारशी तग धरू शकली नाही, कारण ती त्यांनी भावगीताप्रमाणे लिहिली. भट यांनी मराठीची प्रतीके वापरून गझलला एक वेगळा चेहरा दिला. त्यांच्यानंतर आम्ही गझल पुढे नेली, असा दावा काही कवींकडून कार्यक्रम, व्याख्यानातून केला जातो, मात्र सुरेश भटांनी केवळ पुण्यातल्याच नव्हे, तर महाराष्ट्रातील अनेक कवींना मार्गदर्शन केले आहे. मात्र कुणीही अशी विधाने करीत नाहीत. आजचा तरुणवर्ग चांगली गझल लिहित आहे. साहित्य संमेलनातील काव्यकट्ट्यामध्ये तरुण पिढी उत्स्फूर्तपणे गझल सादर करतानाही दिसत आहे. मात्र असेही एक चित्र पाहायला मिळत आहे, ज्यांना गझल काय, हे माहिती नसतानाही गझलच्या कार्यशाळा घेताना दिसत आहेत. नुसतं तंत्र कळल्याने गझल येत नाही. गझल म्हणजे दु:खाची, सुखाची मिरवणूक नसते. त्याच्यामधून जीवनच वाहते. यासाठी आयुष्याला भिडता आले पाहिजे. प्रत्येक अनुभवाला चेहरा देणे कलाकाराचे काम असते. शब्दांच्या साहाय्याने शब्दांच्यापलीकडचा अनुभव शब्दांतून व्यक्त करणे ही खरी गझल असते. मात्र आज काही गझलकारांनी सुरेश भट यांचे बोट सोडलेलेच नाही. त्यामुळे गझलच्या दिशेने ते स्वतंत्र वाटचाल करीतच नाहीत. नवीन पिढीला चांगले मार्गदर्शनच मिळत नाही. गझलच्या कार्यशाळांमधून रियाज होतो, मात्र साधना होत नाही. गझलची स्थिती सध्या आशा आणि निराशाजनक आहे. चाळीस टक्के गझल चांगल्या, तर ६० टक्के टुकार गझल असतात.

Web Title: Critics do not know the technical accuracy of Ghazal - Raman Ranadeev

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.