काय सांगता! पुण्यातील नदीपात्रात मगर? पोलीस प्रशासनाची धावपळ अन् नागरिकांची तोबा गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2021 06:22 PM2021-02-27T18:22:53+5:302021-02-27T18:35:12+5:30
काही दिवसांपूर्वी पुण्यातील मुठा नदीच्या पात्रात मगर दिसल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली होती...
पुणे : काही दिवसांपूर्वी पुण्यातील मुठा नदीच्या पात्रात मगर दिसल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली होती. यानंतर प्रशासनाची एकाच धांदल उडाली होती. मात्र नंतर ही अफवा असल्याचे सिद्ध झाले आणि प्रशासनासह पुणेकरांनी सुटकेचा निःश्वास सोडला. परंतू, शनिवारी पुन्हा एकदा नदीपात्रात पुण्यातील भिडे पुलाखालील नदीपात्रात मगर दिसल्याची अफवा वाऱ्यासारखी पसरली.आणि नदीपात्रात बघ्यांची एकच गर्दी जमा झाली.
पुणे शहरातील नदीपात्रात पुन्हा एकदा मगर दिसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यामुळे परिसरात नागरिकांनी मगर पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. काहीवेळ नदीपात्रात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. त्यामुळे पोलिस व महापालिका प्रशासनाची पुन्हा एकदा धावपळ झाल्याचे पाहायला मिळाले. या बातमीने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. काही प्रशासनाने नदीपात्रात खरोखर मगर आहे का याचा बारकाईने शोधाशोध घेतल्यानंतर ही अफवा असल्याचे निष्पन्न झाले. आणि यानंतर महापालिका, पोलीस प्रशासनासह नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला.
गेल्या १२ फेब्रुवारी रोजी पुणे पोलिसांना नदीपात्रात मगर दिसल्याचा एका तरुणाने फोन केला होता. मात्र त्यानंतर पोलिसांनी बारकाईने पाहणी केली असता ती मगर नसून पाण्यातील कचऱ्यात अडकलेली प्लॅस्टिकची बाटली असल्याचे लक्षात आले. त्यामुळे पोलिसांनी नदीपात्रात मगर असल्याचे अफवेला तिथेचं पूर्णविराम दिला. पाण्याच्या प्रवाहामुळे बाटली हलत असल्याने नागरिकांना ती मगर असल्याचे वाटले. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात मोठी गर्दी झाली होती आणि यामुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली. त्यामुळे वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी वाहतूक विभागाचे पोलिसही कामाला लागले.