पीक कर्जमुक्तीने वाढले कर्जबाजारीपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:09 AM2021-03-21T04:09:46+5:302021-03-21T04:09:46+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे: सरकारकडून महात्मा फुले कर्जमुक्ती योजना राबवली गेल्याने, जिल्ह्यातील बँकाकडून यंदा जास्त शेतकऱ्यांना पीक कर्जवाटप केले ...

Crop debt relief increased debt | पीक कर्जमुक्तीने वाढले कर्जबाजारीपण

पीक कर्जमुक्तीने वाढले कर्जबाजारीपण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे: सरकारकडून महात्मा फुले कर्जमुक्ती योजना राबवली गेल्याने, जिल्ह्यातील बँकाकडून यंदा जास्त शेतकऱ्यांना पीक कर्जवाटप केले आहे. मात्र, या दरवर्षीच्या पीक कर्जमाफी योजनांमुळे पीककर्जाची नियमित फेड करणाऱ्यांच्या संख्येत घट होऊ लागल्याचे बँक अधिकाऱ्यांचे निरीक्षण आहे.

जिल्ह्यात ४२ बँकांकडून शेतकऱ्यांना पीककर्ज देण्यात येते. बँक ऑफ महाराष्ट्र या बँकांची अग्रणी बँक आहे. त्यांच्याकडील आकडेवारीनुसार यंदाच्या आर्थिक वर्षात ( सन २०२०-२१) ३ लाख ३८ हजार ५९७ शेतकऱ्यांना पीककर्ज देण्यात आले आहे. या कर्जाची एकूण रक्कम ३ हजार १७९ कोटी रुपये इतकी आहे. ही आकडेवारी २८ फेब्रुवारी, २०२१ पर्यंतची आहे. ३१ मार्च, २०२१ पर्यंत यात आणखी वाढ होऊ शकते.

मागील वर्षी ( सन २०१९-२०) याच बँकांकडून जिल्ह्यातील २ लाख ५७ हजार शेतकर्यांना पीककर्ज देण्यात आले होते. ती एकूण रक्कम २ हजार ८६१ कोटी रुपये होते.

मागील आर्थिक वर्षापेक्षा या वर्षी आतापर्यंत ८१ हजार ५९७ जास्त शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यात आले. मागील वर्षीपेक्षा कर्जाची रक्कमही ३१८ कोटी रुपयांनी जास्त आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमुक्ती योजनेमुळेच बँकांनी या वर्षी जास्त कर्ज दिले आहे.

कर्जमाफी दिली की, सरकारकडून बँकांना माफी दिलेल्या रकमेचा पुरवठा केला जातो. शेतकऱ्यांकडून मिळणार नाही, ते कर्ज या पद्धतीने मिळत असल्याने असा निर्णय झाला की, बँका त्वरेने शेतकऱ्यांना नवे कर्ज ऊपलब्ध करून देतात. त्यामुळेच या वर्षी जास्त शेतकऱ्यांना कर्ज मिळाले आहे.

दरम्यान, सातत्याने होत असलेल्या कर्जमुक्ती योजनांमुळे नियमित कर्ज फेडणाऱ्यांच्या संख्येत घट झाली आहे, असे बँक अधिकाऱ्यांचे निरीक्षण आहे. कर्जमुक्ती योजनेचे निकष असतात. अल्प भूधारक, किती कर्ज आहे, किती हप्ते थकले आहेत, कधीपासून थकलेत अशा अटींचा, नियमांचा त्यात समावेश असतो. त्याचाही विचार आता कर्ज घेताना शेतकऱ्यांकडून केला जातो, असे काही बँक अधिकाऱ्यांनी सांगितले.

------

कर्जमुक्तीमुळे अनेक शेतकरी नव्या पीक कर्जाला पात्र ठरले. मागणी झाली की, त्यांना नव्याने पीक कर्ज देणे बँकांवर बंधनकारक आहे. त्यामुळे संख्या वाढली आहे.

- आनंद बेडेकर-महाप्रबंधक, बँक ऑफ महाराष्ट्र, अग्रणी बँक

---------

शेती चांगली झाली तर कर्जफेड केली जातेच, पण नैसर्गिक आपत्तीमुळे पीक गेले की, कर्जाचे हप्ते थकून व्याज वाढत जाते. कर्जमाफी योजना अशा वेळी उपयोगी पडते. महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेमुळे आमचा फायदा झाला आहे.

- भीमराव बागल - मंचर

Web Title: Crop debt relief increased debt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.