दुष्काळी पट्ट्यात फुलू लागली ऊसशेती
By Admin | Published: December 26, 2016 02:16 AM2016-12-26T02:16:07+5:302016-12-26T02:16:07+5:30
पुरंदर तालुका कायमस्वरुपी दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी पावसाचे प्रमाण अत्यल्प असते.
मामासाहेब गायकवाड / भुलेश्वर
पुरंदर तालुका कायमस्वरुपी दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी पावसाचे प्रमाण अत्यल्प असते. यामुळे येथील शेतीला ही तारेवरची कसरत आहे. पण गेली पाच वर्षे तालुक्यात पुरंदर उपसा जलसिंचन योजनेचे पाणी आले आणि पुरंदरची माळराने बागायती झाली. एवढेच नव्हे, तर चक्क बागायती जमिनीत मोठ्या प्रमाणात उसाच्या लागवडी झाल्या. यामुळे पुरंदरचा पूर्वपट्टा कायमस्वरुपी दुष्काळी असतानाच मात्र ऊसशेती फुलू लागली.
पुरंदर तालुक्यात कायमस्वरुपी दुष्काळी असणारा पूर्वपट्टा पुरंदर उपसा जलसिंचन योजनेच्या माध्यमातून कायमस्वरुपी दुष्काळी ओळख पुसून बागायतदार झाला. पुण्याचे वापर केलेले पाणी मुळा-मुठा नदीमध्ये सोडून पंपाद्वारे उचलण्यात आले आहे. यामुळे पुरंदर उपसा जलसिंचन योजना सुरू राहण्याला कोणत्याही धरणाची गरज नाही. यामुळे पुण्याला जेवढे जास्त पाणी मिळेल, तेवढे पाणी पुरंदर उपसा जलसिंचन योजनेला मिळते. यामुळे या योजनेला सहसा पाणी कमी पडत नाही.
पुरंदर तालुक्यात अनेक गावे आठमाही बागायतदार आहेत. उर्वरित चार महिने दुसऱ्या तालुक्यातील गावात रोजंदारीशिवाय पर्याय नव्हता. मात्र पुरंदर उपसा जलसिंचन योजना तयार झाली आणि आठमाही बागायतदार असणारा तालुका बारमाही बागायतदार झाला. पुरंदर तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली, की राज्य शासन मोफत पाणी सोडते. यामुळे पुरंदर तालुक्यातील अनेक गावांतील पाण्यासाठीची चणचण दूर झाली. हे पाणी, ओढे, नाले, मोठमोठी तळी यामध्ये सोडल्याने तालुक्यातील पाण्याची पातळी वाढली. यामुळे अनेक विहिरी बारमाही पाण्याच्या झाल्या.
टोमॅटो, वाटाणा, फुले या पिकांचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेणे सुरू झाले. कायमस्वरूपी पाणी सुटणाऱ्या भागात आता तर चक्क उसाचे फड डोलू लागले आहेत.
पुरंदर उपसा जलसिंचन योजना कायमस्वरूपी सुरू राहण्यासाठी सणसमळा परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे योगदान आहे.
आंबळे गावच्या हद्दीतून पुरंदर उपसा जलसिंचन योजनेचे पाणी सोडण्यात येते. ते थेट सणसमळा म्हणजेच राजेवाडी तलावात येते. येथील शेतकरी वेळेवर पैसे भरून पाणी घेतात.
पैसे भरण्याचे त्यांनी जवळपास वेळापत्रकच तयार केले आहे. यामुळे येथील शेतकऱ्यांचे एकही पीक वाया जात नाही. पिकाला वेळेवर पाणी मिळत असल्याने फळे, फुले, विविध पिकाबरोबरच चक्क उसाची शेती फुलू लागली आहे.
ऊस सोमेश्वर सहकारी साखर कारखाना व दौंड शुगर साखर कारखाना या ठिकाणी पाठविला जातो. यामुळे येथील शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळतात. याकामी पुरंदर उपसा जलसिंचन योजनेचे शाखा अभियंता साहेबराव भोसले यांची चांगलीच मदत होते. त्यांच्या योग्य नियोजनामुळे आज ही योजना सुरळीत चालू आहे. एकंदरीत पुरंदर उपसा जलसिंचन योजना सुरू झाल्यामुळे उसाच्या क्षेत्रात नक्कीच वाढ झाली आहे.
- रामदास सणस, पुरंदर उपसा जलसिंचन योजनेचे लाभार्थी शेतकरी
पुरंदर उपसा जलसिंचन योजनेचे पाणी पुरंदर तालुक्यात आल्यामुळे येथील शेती बारमाही बागायतदार झाली आहे. त्यामुळे या ठिकाणी उसाची शेती डोलू लागली आहे. सर्वसामान्य माणसांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ झाली आहे.
- गणेश ढोल, दौंड शुगर कृषी अधिकारी