बारामती, इंदापूर तालुक्यात पीकविमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:15 AM2021-09-04T04:15:41+5:302021-09-04T04:15:41+5:30
वैभव तांबे : जिल्हाधिकाऱ्यांनी केली अधिसूचना जारी बारामती : बारामती व इंदापूर तालुक्यातील पीकविमाधारक शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीकविमा ...
वैभव तांबे : जिल्हाधिकाऱ्यांनी केली अधिसूचना जारी
बारामती : बारामती व इंदापूर तालुक्यातील पीकविमाधारक शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीकविमा योजनेअंतर्गत २५ टक्के आगाऊ रक्कम देण्यात येणार आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचना नुकतीच जारी केल्याची माहिती विभागीय कृषी अधिकारी वैभव तांबे यांनी दिली.
पुणे जिल्ह्यातील बारामती व इंदापूर तालुक्यात २१ जुलै ते २५ ऑगस्ट या कालावधीत २५ ते ३५ दिवसांंचा पावसाचा खंड पडल्याने जिल्हास्तरीय समितीची बैठक होऊन, बारामती व इंदापूर तालुक्यातील पीक विमाधारक शेतकऱ्यांना २५ टक्के नुकसान भरपाईच्या प्रमाणात विमाधारक शेतकऱ्यांना आगाऊ रक्कम देण्याची अधिसूचना जारी केली आहे.
अधिक माहिती देताना तांबे म्हणाले, प्रधानमंत्री पीकविमा योजना खरीप, रब्बी व उन्हाळी हंगाम २०२१—२२ साठी जाहीर केली आहे. या योजनेमध्ये खरिपाची चौदा पिके समाविष्ट आहेत. त्यात तालुकानिहाय व महसूल मंडळनिहाय पिके अधिसूचित केलेली आहेत. खरीप हंगामासाठी भात, ज्वारी, बाजरी, नाचणी, भुईमूग, सोयाबीन, मूग, उडीद, तूर, कांदा या पिकांचा या योजनेमध्ये समावेश आहे.
शेतकऱ्यांनी रब्बी, उन्हाळी तसेच खरीप हंगामातदेखील जास्तीत जास्त प्रमाणात आपल्या पिकांचा पीकविमा काढावा. त्यामुळे नैसर्गिक आपत्ती, स्थानिक आपत्ती तसेच प्रतिकूल परिस्थितीमुळे होणारे संभाव्य नुकसानीची भरपाई मिळेल. सर्व शेतकऱ्यांनी यापुढे आपल्या पिकाचा विमा नियमितपणे काढण्याचे आवाहन तांबे यांनी केले आहे.
तसेच योजनेत प्रत्येक पिकाचा विमा संरक्षणासाठी जोखीम स्तर ७० टक्के व पीकनिहाय विमा संरक्षित रक्कम निश्चित केलेली आहे. विम्याच्या हप्त्याची रक्कम शेतकरी, केंद्र शासन व राज्य शासन भरत असते. शेतकऱ्यांचा विमा हिस्सा हा पीकनिहाय २ ते ५% इतका आहे. उर्वरित ९५ ते ९८ टक्के रक्कम केंद्र शासन व राज्य शासन भरते.
विमा संरक्षित रकमेची नुकसानभरपाई शासनाच्या कृषी महसूल व ग्रामविकास विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या पीक कापणी प्रयोगाच्या आधारे शेतकऱ्यांना दिली जाते. याचबरोबर स्थानिक आपत्ती व प्रतिकूल परिस्थितीमुळे उदाहरणार्थ पूर, पावसातील खंड, दुष्काळ यामुळे अपेक्षित उत्पादनात सरासरी उत्पादनाच्या ५० टक्केपेक्षा जास्त घट अपेक्षित असेल तर नुकसानभरपाईच्या प्रमाणात विमाधारक शेतकऱ्यांना २५ टक्केच्या मर्यादेत आगाऊ रक्कम देण्याची तरतूद आहे.
इंदापूर तालुक्यातील तूर व सोयाबीन तसेच बारामती तालुक्यातील तूर, भुईमूग व सोयाबीन या पिकांचा विमा घेतलेल्या संपूर्ण शेतकऱ्यांना ही आगाऊ रक्कम मिळणार आहे. तसेच इंदापूर तालुक्यातील सणसर व बारामती तालुक्यातील सुपा, लोणी भापकर, मोरगाव, करंजेपूल या महसूल मंडळातील बाजरी पिकाचा विमा घेतलेल्या सर्व शेतकऱ्यांना ही नुकसानभरपाईची २५% रक्कम देणेकरिता अधिसूचना जारी केली आहे.
————————————————