पावसाअभावी भातपिकाचे नुकसान, शेतकरी चिंतीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 02:04 AM2018-09-26T02:04:37+5:302018-09-26T02:04:58+5:30

भोर येथील बहुतेक परिसरात भाताच्या पिकाचे उत्पादन होते. गेल्या काही दिवसांपासून परिसरात पावसाने दडी मारल्याने भाताच्या पिकाचे नुकसान झाले आहे.

crop losses due to lack of rain, farmers worry | पावसाअभावी भातपिकाचे नुकसान, शेतकरी चिंतीत

पावसाअभावी भातपिकाचे नुकसान, शेतकरी चिंतीत

Next

भोर : येथील बहुतेक परिसरात भाताच्या पिकाचे उत्पादन होते. गेल्या काही दिवसांपासून परिसरात पावसाने दडी मारल्याने भाताच्या पिकाचे नुकसान झाले आहे.
या परिसरात भाताची सुमारे ७५०० हेक्टरवर लागवड करण्यात आली आहे. तर मागील १२ ते १५ दिवसांपासून पाऊस पडत नसल्याने व भातखाचरातील पाणी आटल्यामुळे पिकाला अन्नद्रव्याची कमतरता झाली आहे. त्यामुळे भातपिकावर विपरीत परिणाम होऊन विषाणुजन्य करप्या व बुरशीजन्य करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे भाताचे पीक कमी होण्याची भीती असल्याने शेतकरी आकाशाकडे डोळे लावून पावसाची वाट पाहत आहेत.
भोर तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र ८८५९२ हेक्टर असून, खरीप पिकाखालील १५५ गावे असून, २० हजार हेक्टर क्षेत्र आहे. तर रब्बी पिकाखालील गावे ४१ असून क्षेत्र १७४०० हेक्टर आहे. बागायती क्षेत्र ७३३४ हे तर जिरायती क्षेत्र ३०३०८ हे असून, एकूण लागवडीखालील क्षेत्र ३७६४२ हे आहे. तालुक्यातील प्रमुख पीक भात असून, ५० हेक्टरवर रोपवाटिका तयार करून सुमारे ७५०० हेक्टरवर भाताची लागवड केली जाते. यात इंद्रायणी, बासमती, फुले, समृद्धी, रत्नागिरी २४, कर्जत, आंबेमोहोर, तामसाळ या हळव्या आणि गरव्या जातीच्या भाताची लागवड केली जाते. तालुक्यात भाताची ७५०० हेक्टवर लागवड झाली असून, त्यातील ५० एकरवर यंत्राद्वारे लागवड करण्यात आली आहे.
या वर्षी वेळेत आणि समाधानकारक पाऊस झाल्याने ५० हेक्टरवर भाताचे बी पेरले होते. वेळेवर पाऊस झाल्याने १०० टक्के भाताची लागवड झाली असून, भाताचे पीक जोमात होते. त्यामुळे उत्पन्नात वाढ होईल असे वाटत असताना अचानक पावसाने दडी मारल्याने सध्या भात पोषण्याची वेळ असताना मागील १२ ते १५ दिवसांपासून पावसाने दांडी मारल्याने डोंगरउतारावरील झरे आटले असून, ओढ्यानाल्यांचे पाणी कमी झाले आहे. त्यामुळे माळरानावरील भातखाचरातील पाणी आटल्याने खाचरात वड्या पडल्या असून, भातावर काही ठिकाणी जीवाणुजन्य करपा, तर काही भागात विषाणुजन्य करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला असून पिके पिवळी पडू लागली आहेत. अनेक ठिकाणी भाताचे दाणे बाहेर पडत असताना पाणी नसल्याने दाणा भरण्यास अडचण होणार असल्याचे दिनकर कुडपणे यांनी सांगितले.

५0 एकरवर लागवड

तालुक्यातील हिर्डोशी, महुडे, वेळवंड, भुतोंडे, आंबवडे, वीसगाव खोऱ्यात मोठ्या प्रमाणात भाताची लागवड केली जाते.
यामुळे सदर विभागाला भाताचे आगार समजले जाते, तर सध्या कृषी विभागाच्या मदतीने यंत्राद्वारे, हातवे, सणसवाडी, माळेगाव, नाटंबी, महुडे, खानापूर या गावांत रोपवाटिका करून ५० एकरवर भाताची लागवड आधुनिक पद्धतीने केली आहे. शेतकºयांचा कल भातशेतीही आधुनिक पद्धतीने करण्याकडे वाढत असल्याने पुढील काळात यात अजून वाढ होणार आहे.

मागील १४ दिवसांपासून पाऊस गायब झाल्याने खाचरातील पाणी कमी झाले असून, पावसाअभावी वातावरणातील बदल, अन्नद्रव्य याच्या कमतरतेमुळे भातपिकावर विपरीत परिणाम झाला असून, पिकावर विषाणुजन्य करपा आणि जीवाणुजन्य करपा रोगाचा प्रादुर्भाव होऊन भाताचे पीक पिवळे पडू लागले आहे. पिकांवर यापुढील आठवडाभर पाऊस आला नाही तर भाताचे पीक पोषण्यास अडचण होऊन पिकावर उत्पन्नावर मोठ्या प्रमाणात परिणाम होणार आहे. यावर उपाय म्हणून खाचरात पाणी सोडावे.
नत्राचा पाण्याच्या उपलब्धतेनुसार वापर करावा व करपा रोगाच्या नियंत्रणासाठी हायड्रॉक्साईड पाण्यात मिसळून फवारणी करावी.
भात कीड नियंत्रणासाठी ५० टक्के अनुदानावर औषधे तालुका कृषी अधिकारी कार्यालयात उपलब्ध असल्याचे तालुका कृषी अधिकारी सूर्यकांत वडखेलकर यांनी सांगितले.

Web Title: crop losses due to lack of rain, farmers worry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.