पिके उगवली! बळीराजा माॅन्सूनच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:14 AM2021-06-16T04:14:39+5:302021-06-16T04:14:39+5:30
शेलपिंपळगाव : मृग नक्षत्र सुरू होऊन आठ दिवस झाले आहेत. तरीसुद्धा माॅन्सूनची कृपा होत नसल्याने खरीप हंगामातील पेरणी ...
शेलपिंपळगाव : मृग नक्षत्र सुरू होऊन आठ दिवस झाले आहेत. तरीसुद्धा माॅन्सूनची कृपा होत नसल्याने खरीप हंगामातील पेरणी केलेली पिके पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. आकाशात पाणीदार ढगांची वर्दळ असूनही वरुणराजा बरसत नसल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे. विशेष म्हणजे मुंबईत सक्रिय झालेला माॅन्सून पुन्हा एकदा बंद झाल्याच्या वृत्ताने शेतकऱ्यांची चिंता अधिक वाढली आहे. पावसाळी हंगामाची सुरुवात ही खरीप हंगामाची सुरुवात असते. या वर्षीच्या खरीप हंगामी वर्षाला ८ जूनपासून सुरुवात झाली आहे. प्रारंभीच्या नक्षत्रात झालेल्या पिकांच्या पेरण्या वाढीच्या तसेच उत्पादनाच्या दृष्टीने किफायतशीर असतात. त्यातच माॅन्सूनपूर्व वळवाच्या पावसाच्या ओलीवर उत्पादकांनी मृग नक्षत्रात पिकांच्या पेरणीला प्राधान्य देत भुईमूग, सोयाबीन, बाजरी, मूग, वाटणा, कडधान्य, पालेभाज्या या पिकांची पेरणी केली आहे. मात्र, अद्यापही माॅन्सूनच्या बरसण्याची प्रतीक्षा शेतकऱ्यांच्या वाट्याला येत आहे.
मृग नक्षत्राच्या तोंडावर माॅन्सूनपूर्व वळवाच्या पावसाने दमदार हजेरी लावल्याने अनेक शेतकऱ्यांनी पावसाचा अंदाज बांधून पेरणी पूर्ण केली आहे. सध्या पिकांची उगवणी होत आहे. मात्र खरिपाच्या पेरणीनंतर पावसाने पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांचे खरीप पेरणीचे गणित बिघडते की काय, असा सवाल समोर उभा राहू लागला आहे.
चौकट
चालू वर्षी माॅन्सूनपूर्व पावसाने मोठी साथ दिली असून सलग तीन ते चार मोठा पाऊस झाला आहे. त्यामुळे विहिरींच्या पाणीपातळीत चांगली वाढली झाली आहे. त्यामुळे माॅन्सूनने अजून काळ ओढ दिली तर पाट पाण्याचा आसरा घेण्यास शेतकऱ्यांना मदत होणार आहे.
फोटो ओळ : माॅन्सूनपूर्व पावसाच्या ओलीवर पेरणी केलेले मूग पीक उगवले असून, सध्या या पिकाच्या वाढीसाठी पावसाची गरज आहे. (छाया : भानुदास पऱ्हाड)