राज्यात अडीच हजारहून अधिक हेक्टरवरील पिकांना अवकाळीचा फटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 12:41 IST2024-12-30T12:40:50+5:302024-12-30T12:41:20+5:30
सर्वाधिक फटका जळगाव जिल्ह्यातील यावल व रावेर या केळीबहुल भागात केळीची झाडे उन्मळून पडली असून तूर, गहू, हरभरा पिकालादेखील फटका बसला असून भाजीपाल्याचे ही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे

राज्यात अडीच हजारहून अधिक हेक्टरवरील पिकांना अवकाळीचा फटका
पुणे : राज्यात गेल्या दोन दिवसांपासून होत असलेल्या अवकाळी पाऊस तसेच गारपिटीमुळे रब्बी पिकांना मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. राज्यातील जळगाव, धुळे सांगली जिल्ह्याला या तिन्ही जिल्ह्यात सुमारे २ हजार ६०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. या व्यतिरिक्त आणखी काही ठिकाणी पावसाची नोंद असून या क्षेत्रामध्ये वाढ होण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे. या पिकांमध्ये गहू, हरभरा तसेच केळी आणि द्राक्ष या फळ पिकांचादेखील समावेश आहे.
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार एक कमी दाबाची द्रोणिका रेषा अरबी समुद्रापासून उत्तर कोकणापर्यंत सक्रिय असून असल्याने उत्तर महाराष्ट्र तसेच दक्षिण महाराष्ट्रात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तसेच गारपीटही झाली आहे. विदर्भातील काही ठिकाणी तसेच मराठवाड्यातील काही भागात गारपीटदेखील झाली आहे.
याचा सर्वाधिक फटका जळगाव जिल्ह्यातील यावल व रावेर या केळीबहुल भागात केळीची झाडे उन्मळून पडली आहेत. तूर, गहू, हरभरा पिकालादेखील फटका बसला असून भाजीपाल्याचे ही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार शनिवारी झालेल्या सांगली जळगाव व धुळे या तीन जिल्ह्यांमध्ये सहा तालुक्यांमधील २ हजार ६३९ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात २५० हेक्टरवरील द्राक्ष पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तर जळगाव जिल्ह्यातील रावेर व यावर यावल तालुक्यातील १ हजार १०८ हेक्टरवरील तूर, गहू, मका व केळी या पिकाचे नुकसान झाले आहे. धुळे जिल्ह्यातील शिरपूर, साक्री व शिंदखेडा या तालुक्यातील १ हजार २८१ हेक्टरवरील तूर, गहू, मका व भाजीपाला पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.