वाहतूकदारांच्या संपामुळे कोटींचे नुकसान
By admin | Published: October 5, 2015 01:39 AM2015-10-05T01:39:19+5:302015-10-05T01:39:19+5:30
देशभरातील मालवाहतूकदारांनी पुकारलेल्या बेमुदत बंदचा फटका उद्योगनगरीला बसला आहे. या बंदमुळे एका दिवसाला सुमारे दोन ते अडीच कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान होत आहे
पिंपरी : देशभरातील मालवाहतूकदारांनी पुकारलेल्या बेमुदत बंदचा फटका उद्योगनगरीला बसला आहे. या बंदमुळे एका दिवसाला सुमारे दोन ते अडीच कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान होत आहे. संपूर्ण महाराष्ट्रात तीन लाख, तर देशभरात ८२ लाख गाड्या बंद आहेत.
ट्रान्सपोर्टनगरमध्ये सुमारे ६०० ट्रान्सपोर्ट व्यावसायिक आहेत. प्रत्येक व्यावसायिक दिवसाला ७ ते १० हजार रुपये उत्पन्न मिळवतात. या ट्रान्सपोर्ट कार्यालयामध्ये येणारी वाहने खाली करण्यासाठी व भरण्यासाठी असणाऱ्या हमालांची संख्या २ हजार इतकी आहे. प्रत्येक हमाल दिवसाला किमान ६०० रुपये मिळवितात. आॅल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट असोसिएशन काँग्रेसने बेमुदत बंद पुकारल्याने या सर्व गोष्टींवर त्याचा परिणाम झाला आहे. यामुळे सर्वांचेच दररोजचे उत्पन्न बंद झाले आहे.
ट्रकचे वाहक, क्लिनर, बुकिंग एजन्सी यांचे उत्पन्न या व्यवसायाला जोडलेले असते. याशिवाय वाहतूकनगरीतील चहा-नाष्टा विक्रेते, हॉटेल व्यावसायिक, टायर पंक्चर काढणारे, पानटपरीधारक या सर्वांनाच या बंदचा भुर्दंड सोसावा लागत आहे.
याचप्रमाणे शहरातील छोट्या-मोठ्या उद्योजकांचेही वाहतूकदारांच्या बंदीमुळे नुकसान होत आहे. कच्चा माल आणण्यासाठी व तयार झालेला पक्का माल दुसऱ्या ठिकाणी पाठविण्यासाठी गैरसोय होत आहे.
लघुउद्योजक संघटना अध्यक्ष नितीन बनकर म्हणाले, ‘‘बंद पुकारल्यानंतर शनिवार, रविवार आल्याने काही विशेष फरक पडला नाही. शहरातील अनेक कंपन्या रविवारी बंद असतात. यामुळे फारशी अडचण भासली नाही.’’ (प्रतिनिधी)