पुणे महापालिकेचे कोट्यवधी रुपये गेले ' खड्ड्यात '
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2019 12:36 PM2019-07-10T12:36:59+5:302019-07-10T12:40:04+5:30
गेल्या पंधरा दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे शहरातील रस्त्यांची प्रचंड दुर्दशा झाली आहे.
पुणे : महापालिकेच्या वतीने शहरामध्ये नवीन रस्ते करणे, अस्तित्वात असलेल्या रस्त्यांची दुरुस्ती आणि पावसाळ्यानंतर पडलेले खड्डे बुजविण्यासाठी दरवर्षी सरासरी तब्बल ७०० ते ८०० कोटी रुपयांचा खर्च करण्यात येतो. केवळ रस्ते आणि फुटपाथवर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये खर्च करुन देखील पुणेकरांच्या नशिबी रस्त्यांची प्रचंड दुर्दशाच येत आहे. गेल्या काही वर्षांत शहरामध्ये पहिल्या पावसानंतर बहुतेक सर्व रस्ते खड्डेमय होत असून, याचा भुर्दंड पुणेकरांना सहन करावा लागत आहे.
गेल्या पंधरा दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे शहरातील रस्त्यांची प्रचंड दुर्दशा झाली आहे. थोड्याशा पावसाने बहुतेक सर्वच रस्त्यांना ओढा-नाल्यांचे स्वरुप येत असून, नागरिकांना जीव मुठीत घेऊन रस्त्यांवरील पाण्यामधून वाहने चालवावी लागतआहेत. तर एक-दोन पावसात कोट्यवधी रुपये खर्च बांधलेल्या, दुरुस्ती केलेल्या रस्त्यांना खड्डे पडतात. शहरामध्ये पडलेल्या खड्ड्यांमुळे गेल्या काही दिवसांत शहरातील वाहतूक प्रचंड मंदावली असून, सकाळ, संध्याकाळ संपूर्ण शहराची वाहतूक कोंडी होत आहे. महापालिका प्रशासनाकडून शहरातील रस्त्यांवर दर वर्षी कोट्यवधी रुपये खर्च करुन देखील पुणेकरांना रस्त्यांच्या चांगल्या दर्जांच्या सुविधा मिळणे कठीण झाले आहे.
महापालिकेच्या सन २०१८-१९ च्या अंदाजपत्रकामध्ये शहरात नव्याने रस्ते, फुटपाथ विकसित करणे, रस्ते, फुटपाथची दुरुस्ती आणि पावसाळ््यानंतर पडणारे खड्डे बुजविण्यासाठी तब्बल ६९९ कोटी रुपयांचे बजेट प्रस्तावित करण्यात आले होते. तर चालू अंदाजपत्रकामध्ये सन २०१९-२० साठी केवळ पथ विभागासाठी ८४९ कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली आहे.
--------------------------
निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे रस्त्यांना खड्डे
महापालिकेच्या वतीने सहा महिन्यांपूर्वीच नव्याने काम करण्यात आलेल्या अनेक डांबरी रस्त्यांची गेल्या काही दिवसांपासून शहरामध्ये सुरु असलेल्या पावसामुळे चाळण झाली आहे. विशेष म्हणजे अनेक सिमेंट रस्त्यांवर देखील जागो-जागी खड्डे पडले आहे. सिमेंट रस्ते करताना शास्त्रीय पध्दतीचा विचार न केल्याने, या रस्त्यांवर पावसाचे पाणी वाहून नेण्याची कोणतीही सुविधा नसल्याने सिमेंट रस्ता आणि फुटपाथच्या मधील भागामध्ये प्रचंड खड्डे पडून धोकादाय स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे एकूणच शहरातील रस्त्यांच्या कामांच्या दजार्बाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
---------------------
रस्ते खोदाईनंतरच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष
शहरामध्ये दरवर्षी पाणी पुरवठा, ड्रेनेज लाईन, केबल, सीएनजी गॅस आदी विविध कामांसाठी मोठ्या प्रमाणात रस्ते खोदाई करण्यात येते. यामध्ये महापालिकेच्या वतीने रस्ते खोदाईला परवानगी देताना खोदलेले रस्ते पुर्ववत करण्यासाठी येणारा खर्च संबंधितांकडून वसूल केला जातो. तर महापालिकेच्या काही विभागा मार्फत रस्ते खोदाई करण्यात आल्यास रस्ते दुरुस्ती करण्याची जबाबदारी देखील त्याच विभागाची असते. पंरतु यंदा शहरामध्ये रस्ते खोदाईनंतर करण्यात येणारी रस्ते दुरुस्ती आणि डागडुजी व्यवस्थित न झाल्याने खड्ड्यांमध्ये अधिकच भर पडली आहे. यामुळे हा रस्ते दुरुस्तीचा खर्च देखील पाण्यात गेला आहे.
-------------------------
रस्त्यांवर पाणी साठ्याचे नवीन ४० ठिकाणे
शहरामध्ये गेल्या आठ-दहा दिवसांत झालेल्या पावसामुळे शहरातील विविध रस्त्यांवर सुमारे ४० ठिकाणी नव्याने पाणी साठून वाहतूकीला अडथळा ठरत असल्याचे समोर आले आहे. या सर्व ठिकाणी तातडीने पाणी काढून देणे, पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था करण्यात येत आहे.
- अनिरुध्द पावसकर, पथ विभाग प्रमुख,महापालिका