दहशतवादी कातिल सिद्दीकीच्या खूनप्रकरणी उलटतपासणी पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 02:34 AM2018-06-10T02:34:17+5:302018-06-10T02:34:17+5:30
दहशतवादी कातिल सिद्दीकीचा येरवडा जेलमधील अंडासेलमध्ये बर्मुड्याच्या नाडीने गळा आवळून खून केल्याच्या खटल्यात फिर्यादी जेल अधिकारी चंद्रकिरण तायडे यांची उलटतपासणी शुक्रवारी पूर्ण झाली.
पुणे - दहशतवादी कातिल सिद्दीकीचा येरवडा जेलमधील अंडासेलमध्ये बर्मुड्याच्या नाडीने गळा आवळून खून केल्याच्या खटल्यात फिर्यादी जेल अधिकारी चंद्रकिरण तायडे यांची उलटतपासणी शुक्रवारी पूर्ण झाली. सहा वर्षांनी या खटल्याची सुनावणी सुरू झाली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एच. ग्वालानी यांच्या न्यायालयात ही सुनावणी झाली.
संशयित दहशतवादी मोहम्मद कातिल मोहम्मद जाफर सिद्दीकी उर्फ सज्जन उर्फ साजन उर्फ शहजादा सलीम (वय २७, रा बिहार) याचा येरवडा जेलमधील अंडासेलमध्ये ८ जून २०१२ रोजी गळा आवळून खून करण्यात आला होता. याप्रकरणी कुख्यात गुंड शरद हिरामण मोहोळ (वय ३४, रा. माऊलीनगर, सुतारदरा, कोथरूड, ता. मुळशी) आणि आलोक शिवाजीराव भालेराव (२८, रा. मु.पो. मुठा, ता. मुळशी, जि. पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खटल्याचे कामकाज विशेष सरकारी वकील विलास घोगरे पाटील पाहत आहेत. मागील सुनावणीत या खटल्यातील फिर्यादी जेल अधिकारी चंद्रकिरण तायडे यांची साक्ष नोंदविण्यात आली होती. शुक्रवारी त्यांची उलटतपासणी पूर्ण झाली. या सुनावणीला कातिल सिद्दीकीचा भाऊ उपस्थित होता. या खटल्याची पुढील सुनावणी २२ जून रोजी होणार आहे. जर्मन बेकरी स्फोटाच्या वेळेस पुण्याच्या दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराजवळ बॉम्ब ठेवण्याचा प्रयत्न करणारा संशयित दहशतवादी कातिल सिद्दीकी हा इंडियन मुजाहिदीन संघटनेचा दहशतवादी होता.